भाजपची नवी खेळी

लहानगा उंट चांगला दिसतो म्हणून घरात घेतला, मात्र त्याच उंटाला घराबाहेर काढताना जशी घरमालकाची अवस्था होते तशीच अवस्था आजच्या घडीला खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी भाजपाशी केलेली सोयरीकच शेट्टी यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत असून लोकसभेसाठी हातकणंगले मतदार संघातच शेट्टींची कोंडी करण्याचा घाट भाजपाने घातल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सातत्याने राज्य व केंद्र शासनावर टीका करीत रस्त्यावर आंदोलन करणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याविरूध्द त्यांचा प्रभाव क्षेत्र असलेल्या असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातच कोंडी करण्याचे मनसुबे भाजपाने रचले आहेत. सांगली जिल्’ाातील राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि वारणा खोऱ्यात राजकीय वर्चस्व असलेल्या विनय कोरे यांच्याशी भाजपाने जवळीक केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात सांगलीतील वाळवा आणि शिराळा या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघामध्ये राष्ट्रवादीची ताकद असतानाही मागील दोन निवडणुकीमध्ये स्वाभिमानीच्या शिट्टीला मतदारांनी चांगलीच साथ केली.

खासदार शेट्टींनी पंचायत समितीपासून आपली राजकीय घोडदौड सुरू केली. याला अर्थातच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील या उस पट्टय़ात साखर कारखानदारीतून निर्माण झालेली राजकीय संस्थानाची पाश्र्वभूमी आहे. मात्र राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला ढासळण्यासाठी शेट्टींना प्रसंगी काँग्रेसचीही कुमक मिळाली. तशी राष्ट्रवादी अंतर्गत असलेल्या आमदार जयंत पाटील यांच्या विरोधकांचीही मदत मिळाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून स्वाभिमानीने केवळ चळवळ हाती न घेता सत्तास्थाने काबीज करण्यावर भर दिल्याने याचे पडसाद काँग्रेसच्या व राष्ट्रवादीच्या पारंपारिक संस्थांनाना धक्का देणारे ठरले.

दिल्ली आणि मुंबईच्या स्तरावर कोणाशी तरी राजकीय सोयरीक करणे भाग होते. त्याशिवाय कार्यकर्त्यांची सत्तेची उर्मी शांत राहणार नाही हे ओळखून ज्या भाजपाला उजव्या शक्तीचा पक्ष म्हणून सवता सुभा मांडला त्याच भाजपाशी तडजोड केली. महायुतीत सहभागी होत असताना प्रत्येक घटकांना पक्ष अथवा संघटना विस्ताराची मोकळीक देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र एकमेकांचा आधार घेत असताना दुसर्याच्या तंबूतील कार्यकत्रे आपल्या तंबूत ओढण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला नव्हता.

नेमका याच गोष्टींचा लाभ घेत भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस मुक्तीचा नारा देत अन्य लहान घटक पक्षांना अस्तित्वहीन करण्याचे मनसुबे रचले गेले. खा. शेट्टी यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी वारणा खोऱ्यातील विनय कोरे यांच्याशी भाजपाने जवळीक करीत असतानाच स्वाभिमानीचे   खोत यांनाही सत्तेची उब देउन बेबनाव निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले. यामुळे आज संघटनेतील एक नेतृत्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळविण्यासाठी वैशाख वणव्यात रस्त्यावर आहे, तर एक नेतृत्व वातानुकूलित मोटारीतून बांधावर जाउन प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे किमान दर्शवत आहे.

खासदार शेट्टी आणि राज्यमंत्री खोत यांच्यातील दुरावा संघटनेतील ताकद विभागत असल्याचे निदर्शक असला तरी यामागे भाजपाचे आगामी लोकसभेचे आडाखे दिसत आहेत. शेट्टी यांची कोंडी करीत असताना मताधिक्य देणाऱ्या भागातील स्थानिक नेतृत्वाला भाजपाच्या तंबूत सहभागी करून धोरण अवलंबले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्यमंत्री खोत यांचे चिरंजीव सागर खोत, इस्लामपूरचे थेट नगराध्यक्ष झालेले निशीकांत पाटील यांना भाजपा प्रवेशाचे वेध लागले आहेत.

राज्यमंत्री खोत यांना उचकविण्याचे प्रयत्न शेट्टी समर्थकाकडून केले जात आहेत. यासाठी समाजमाध्यमाचा वापर करण्यात येत असून वेगवेगळ्या चर्चा या माध्यमाद्बारे केल्या जात आहेत. यामुळेच राज्यमंत्री खोत यांनी अशा अध्र्या हळकुंडावर पिवळे झालेल्यांना आवर घालण्याचे आवाहन करावे लागले.

स्वाभिमानीतील संघर्ष टोकाचा असला तरी सध्या तरी राज्यमंत्री खोत यांचा राजीनामा मागितला जाण्याची चिन्हे दिसत नाहीत, आणि खोत आजही मी संघटनेचे चळवळीतील कार्यकर्ता असल्याचे आग्रहाने सांगत आहेत. मात्र, आपल्यावर कारवाई केली तर त्याचे पडसाद उमटावेत आणि आपल्या मागे चळवळीतील कार्यकत्रे राहवेत असे धोरण खोत यांचे दिसत आहे. जर कारवाई झाली तर आयते भाजपाप्रवेशाला कारण मिळेल या आशेवर ते आहेत, मात्र ही संधी न देता खोत यांचे महत्व कमी करण्याचे धोरण शेट्टी अवलंबत आहेत.