राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे महत्त्व वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णाकाठच्या सुपीक पट्टय़ातील साखर कारखानदारीला आव्हान देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वत:चे वर्चस्व निर्माण केले. राष्ट्रवादीच्या विरोधात असल्याने काँग्रेसने हस्तेपरहस्ते संघटनेला मदत केली. युतीची सत्ता येताच संघटनेला सत्तेची आस लागली. शेवटी सदाभाऊ खोत यांच्या रूपाने सरकारमध्ये संघटनेला स्थानही मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करीत असताना राज्यमंत्री खोत यांचे महत्त्व वाढविण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संभ्रम निर्माण करण्याची भाजपची खेळी यशस्वी झाली.

सांगली, कोल्हापूर जिल्हय़ातील कृष्णा, पंचगंगा नदीकाठाला असलेल्या ऊस शेतीवर आधारित स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ उभी राहिली. काल-परवापर्यंत या चळवळीतील आक्रमक नेते म्हणून सदाभाऊ खोत यांची ओळख होती. अगदी संघटनेचे कार्यकत्रे खोत यांची मुलुखमदान तोफ म्हणून ओळख करून देत होते. मात्र विधान परिषदेचे सदस्यत्व आणि राज्यमंत्रीपदाची झूल अंगावर येताच या आक्रमकपणाला सत्तेच्या माध्यमातून रोखण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

आपण उभ्या केलेल्या नेतृत्वातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांला मानमरातब मिळू लागला. सत्तेचा लाभ मिळू लागल्याने नाही म्हटले तरी या चळवळीतील आघाडीचे नेतृत्व असलेले खासदार राजू शेट्टी अस्वस्थ होणे स्वाभाविकच ठरले. यातून मनातील खदखद कधी जिल्हा बँकेवरील र्निबधावेळी विरोधाच्या माध्यमातून व्यक्त झाली, कधी शिवस्मारकाच्या उद्घाटन समारंभाच्या आमंत्रणावरून व्यक्त झाली.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवे रान तयार करून त्यामध्ये नांगरट, कुळव आदींचा वापर करीत पिकाची पेरणी करून उत्पादन घेण्यापेक्षा, आयत्या तयार रानात पिकाची पेरणी करून तयार माल मिळतो का, याकडे सत्ताधारी भाजपचे लक्ष आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ढालगावच्या मेळाव्यात राज्यमंत्री खोत आगामी निवडणुकीत आमच्यासोबतच राहणार असल्याचे सूतोवाच करीत असताना या बदल्यात ग्रामीण स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग अतिरिक्त देण्यात येत असल्याची घोषणाही केली.

दुसऱ्या बाजूला आपल्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील शिराळा व वाळवा या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपबरोबर राहण्याची तयारी दर्शवीत खा. शेट्टी यांनी अन्य मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विरोधात कोणाबरोबरही अगदी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार शेट्टी हे काँग्रेससोबत असतील, असे काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांनी मागे जाहीरही केले होते.

छोटय़ा पक्षांची मदत घेऊन चंचुप्रवेश करायचा. पुढे पक्षाची ताकद वाढल्यावर त्या पक्षात फूट पाडायची वा राजकीयदृष्टय़ा खच्चीकरण करायचे, ही भाजपची जुनीच खेळी आहे.

शेजारील गोवा राज्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाबाबत भाजपने हीच खेळी केली. आताही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात बेबनाव निर्माण करण्याची भाजपची खेळी दिसत आहे. शेट्टी आणि सदाभाऊंमध्ये किती समन्वय राहतो यावरच सारे अवलंबून आहे.

अंतर्गत राजकारण..

  • ऊसपट्टय़ात बहुजन समाजाबरोबरच लिंगायत, जैन समाजही आहे. या वर्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून घामाचा रास्त पसा मिळण्यास मदतही झाली, हे कोणीही नाकारू शकणार नाही.
  • मात्र या चळवळीतच आता सत्तेवरील कमळाबाईने फूट पाडून राज्य करण्याचे मनसुबे रचले आहेत. मराठा राजकारणावर पकड मिळविण्यासाठी साखरपट्टा महत्त्वाचा आहे हे ओळखूनच हे राजकारण चालले असल्याचे स्पष्ट दिसते.
  • यातच शिरोळचे आमदार उल्हास पाटील हेही अखेरच्या क्षणी स्वाभिमानीतून बाहेर पडून शिवबंधनातून आमदार झाले, हा इतिहास फार जुना झालेला नाही. साखरपट्टय़ात असलेल्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याचा भाजपचा जसा प्रयत्न आहे तसाच प्रयत्न मित्रपक्षाची असलेली ताकद आपल्या पक्षात सहभागी करणे हेही यामागे राजकारण आहे.
  • शेट्टींनी राज्य सरकारवर टीका करीत असताना जेम्स लेनप्रकरणी ही मंडळी कोठे होती, हा वर्मी घाव घालणारी टीका राज्यमंत्री खोत यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवणारी असली तरी यामध्ये नुकसान मात्र चळवळीचे होते की काय? अशी रास्त शंका कार्यकत्रे उपस्थित करीत आहेत.

शेजारील गोवा राज्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाबाबत भाजपने हीच खेळी केली. आताही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात बेबनाव निर्माण करण्याची भाजपची खेळी दिसत आहे. शेट्टी आणि सदाभाऊंमध्ये किती समन्वय राहतो यावरच सारे अवलंबून आहे.   छोटय़ा पक्षांची मदत घेऊन चंचुप्रवेश करायचा. पुढे पक्षाची ताकद वाढल्यावर त्या पक्षात फूट पाडायची वा राजकीयदृष्टय़ा खच्चीकरण करायचे, ही भाजपची जुनीच खेळी आहे.