शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेची टीका

सांगली : उसाला एफआरपीनुसार एकरकमी दर देता येत नाही हे ज्ञात असतानाही खा. राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेत उस उत्पादकांना फसवल्याची टीका शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी सोमवारी पत्रकार बठकीत केली. यामुळे शेतकरी वर्गाची फसवणूक झाली असून यापुढे शेट्टींच्या आंदोलनावर विश्वास उरलेला नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

श्री. कोले यांनी सांगितले, की साखरेचे मूल्यांकन पाहून बँकाकडून उचल मिळते. यावर आधारित पहिला हप्ता कारखान्याकडून ऊस उत्पादकांना मिळतो. यंदा बाजारातील साखरेचे दर तीन हजारांच्या घरात आहेत. यावर ८५ ते ९० टक्के उचल मिळते. वाहतूक आणि गाळप यांचा खर्च धरला तर एफआरपीनुसार दर देण्यासाठी टनाला ४०० ते ५०० रुपये कमी पडतात हे वास्तव आहे. असे असताना २० दिवस आंदोलन करून स्वाभिमानी संघटनेने काय साध्य केले?

सरकारने एफआरपीचा दर जाहीर करीत असताना साखर उतारा ९.५ टक्के हा पाया ठरवून दर निश्चित केला. हा दर पूर्वीप्रमाणेच ९ टक्के करण्यासाठी शेट्टी यांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेतली होती. एफआरपी प्लस २०० रुपये प्रतिटन मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, अशी जाहीर भूमिका घेतली होती. एवढा दर देणे कारखान्यांना परवडणारे नाही हे ओळखून कोल्हापूर जिल्ह्य़ातील साखर कारखाने बंद ठेवण्यात आले. यात ऊस उत्पादकांचेच नुकसान झाले असून याला जबाबदार शेट्टीच आहेत.

गुजरातप्रमाणे दर मिळावा अशी आमची मागणी आहे. गुजरात आपल्या शेजारीच आहे, त्यांना दर देता येतो मग महाराष्ट्रातील कारखान्यांना का नाही? असा आमचा सवाल आहे. याबाबत शेट्टी कारखानदारांची बाजू धरत आहेत असा आरोपही त्यांनी केला. शेट्टी यांनी आतापर्यंत दूध, भात आणि ऊस यांच्या दरासाठीच आंदोलने केली आहेत, ही आंदोलन करीत असताना दूध डेअरी आणि भात गिरणी सुरू केली. आता साखर कांरखाना काढण्याच्या तयारीत आहेत असा आरोपही त्यांनी या वेळी केला.