देशात औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार नाही अशी गर्जना करत खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. शेती कशी कसायची आणि तण कसेकाढून टाकायचे ते मला समजते, देशातल्या कमळांवर तणनाशके मारून औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार नाही असे शेट्टी यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विद्यार्थाना वह्या वाटप कार्यक्रम येथे आयोजित केला होता. त्याचे वाटप शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांना ५ लाख २९ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजू शेट्टींनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक प्रहार केले .विद्यार्थ्यांच्या उपजत गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. पण सरकारच्या शाळा बंदच्या धोरणामुळे गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. खासगी शिक्षणही परवडणारे ही मुले शिक्षित होणार नाहीत. पुन्हा गुलामगिरीच येणार. यासाठी व्यवस्थापरिवर्तन आवश्यक असून नवा लढा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली .

तिकडे जाऊ नका – शेट्टी

तुमच्यापेक्षाही ‘ते‘ चांगलं काम करतील असे वाटले होते. अच्छे दिनच्या भुलभुलैय्याला भुललो. मारुतीच्या बेंबीत गारवा नसून विंचूच असल्याचे समजल्यावर प्रामाणिकपणे माघारी फिरलो. सत्तापरिर्वतनाचा मला दंश बसला आहे. त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रयत्न करु नये, असे म्हणत राजू शेट्टी यांनी भाजपात प्रवेश न करण्याचा सल्ला दिला .

भाजपची वाट धरणार नाही- सतेज पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांचाही भाजपच्या इच्छुकांच्या यादीत समावेश असल्याचे विधान केले होते , तर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी याबाबत आमदार पाटील यांनी भूमिका जहीर करण्याची मागणी केली होती . त्यावर आज सतेज पाटील म्हणाले , ‘दादा‘ मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा अपमान करणार नाही. पण त्यांनी ऋतुराजला भाजप मध्ये पाठवण्याबाबत विचारले होते . ऋतुराजला भाजपमध्ये पाठवण्याची इच्छा नाही हे कोणतीही संभ्रमावस्था न ठेवता स्पष्ट करतो .