शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप सरकारविरोधात रान उठवणाऱ्यांमध्ये आता आणखी एका मित्रपक्षाची भर पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास येत्या २८ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या विरोधकांवरही आसूड ओढले. विरोधकांची संघर्षयात्रा ही राजकीय स्वार्थासाठी असल्याची टीका त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच कर्जमाफी न मिळाल्यास येत्या २८ एप्रिलपासून आंदोलन करू, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. राजू शेट्टी यांनी यापूर्वीही लोकसभेत  कर्जमाफीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. ‘एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राकडे बोट दाखवितात आणि केंद्र सरकार राज्याकडे. मग नेमके कोणाचे खरे?  उद्योगपतींची कर्जे माफ होतात परंतु शेतकऱ्यांची नाही. बळीराजाचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नुसते आश्वासनच दिले गेले. त्या दिशेने मात्र कोणतीही पावले टाकली गेलेली नाहीत. तुरीचे दर १२ हजारांवरून चार हजारांवर आले, सोयाबीनचे दर अडीच हजारांवर आले. अशाने उत्पन्न दुप्पट कसे होणार?’ असा सवाल करत शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

शिवसेनेने यापूर्वीच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस वगळता शिवसेनेने प्रत्येकवेळी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. सुरूवातीला सरकारला अर्थसंकल्पा मांडू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षांसह सेनेने घेतली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या निवेदनानंतर शिवसेनेने मवाळ पवित्रा घेतला होता.