सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी आहे.  पण याबाबत त्यांनी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. जुलै महिन्याच्या अखेपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेईल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार बठकीत सांगितले.

केंद्र व राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. देशातील ६३ टक्के  लोकसंख्या अवलंबून असलेल्या शेतीसाठी बजेटमध्ये झिरो तरतूद केली आहे. हमीभावात किरकोळ वाढ केली आहे. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे म्हणते, पण झिरो तरतूद करुन सरकारला शेतकऱ्यांचे उत्पन्नात दोन झिरो लावायचे आहेत, असेच धोरण राबविले जात आहेत. त्यामुळे मराठवाडय़ात ८ मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारच्या एकूणच शेतकरी विरोधी धोरणाविरुध्द मोठा उठाव करण्यात येणार आहे. त्यासाठी संघटनेची बांधणी व आंदोलने केली जाणार आहेत.

भाजपाचा लोकसभा निवडणुकीतील विजय हा ईव्हीएमचा आहे. अनेक मतदारसंघाच्या निकालातील मतांत फरक पडला आहे. याविषयी तक्रार करूनही वेळ मारुन नेणारी उत्तरे दिली जातात.  देशात काही ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तेथे भाजपचा पराभव झाला आहे. अनेक जबाबदार पक्ष, नेते, मतदार याबाबत संशय व्यक्त करीत आहेत. काहीजण बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करतात. पण याकडे दुर्लक्ष केले जाते.  निवडणूक आयोगातील अनेक अधिकारी  माहिती सांगितली तर आमच्या जिवाला धोका असल्याचे जाहीरपणे सांगतात. जर्मनीत लोकांनी संशय व्यक्त केल्यानंतर निर्णय बदलला जातो. पण भारतात काहीही कार्यवाही होत  नाही. यावरुन निवडणूक आयोगावर किती दबाव असेल याची कल्पना येते.

महाराष्ट्रात मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मशीन परफेक्ट काम करते. कारण त्यांनी  ४२ जागांचा वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. याविरोधात बामसेफ आंदोलन करीत आहेच. पण आता विविध सामाजिक, राजकीय संघटनांना घेऊन  याविरोधात रान पेटविले जाणार आहे. या वेळी महेश खराडे, भागवत जाधव, संदीप राजोबा, जयकुमार कोले, महावीर पाटील, संजय खोलकुंबे यांच्यासह कार्यकत्रे उपस्थित होते.