मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी  घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली गेली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. मात्र, विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी सरकारला सरकट कर्जमाफीचं काय झालं? सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाचं काय झाल? असा प्रश्न करत, निषेध नोंदवला. दरम्यान, सरकारच्या या घोषणेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया देताना, या कर्जमाफीच्या घोषणेमुळे सरकारने सातबारा कोरा करण्याच्या आश्वसानाची पूर्तता होत नसल्याचे दाखवले आहे.

खर तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. दोन लाखांच्या कर्जमाफीने हे आश्वासन पूर्ण होत नाही. ३० सप्टेंबरपर्यंतचे जे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक पाहता मागील वर्षभरात विशेषता दुष्काळ व त्यांनतर अतिवृष्टी, नापिकी, महापूर यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं होतं. अवकाळी पाऊस व महापुरामुळे ज्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांवर काढलेलं जे पीक कर्ज आहे. त्या पीक कर्जाची  मुदतच मुळात ३० जून रोजी संपते. त्यामुळे ३० जूनच्या अगोदर थकबाकी जाण्याचा प्रश्नच येत नव्हता, असे राजू शेट्टी यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रित म्हटले आहे.

याचबरोबर ज्या पिकांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. त्या पिकांवर ना नुकसानभरपाई मिळाली, ना कर्जमाफीचा त्यांना फायदा मिळाला. त्यामुळे ज्यांचं नुकसान झालं, जे उद्धवस्त झाले ते वंचित राहिले. त्यामुळे नेमकी ही कर्जमाफी कोणाला मिळणार आहे, हे मला  माहिती नाही. परंतु आकडेवारी तपासावी लागेल, नेमके यात किती लाभधारक येतात. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जर ही कर्जमाफी असेल, तर मुळात नुकसान झालेले शेतकरी बसतच नाही, असे देखील शेट्टी यांनी यावेळी सांगितले.