खासदार राजू शेट्टी यांची खंत

जनावरांना जेवढी किंमत आहे तेवढी किंमत शेतकऱ्याच्या आत्महत्येला नाही. शेतकऱ्यांचा सरकार आणि सरकारी धोरणांवरचा विश्वास उडाला आहे, म्हणून आत्महत्या वाढत आहेत, अशी खंत व्यक्त करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी घटना थांबण्यासाठी शेतकरी चळवळ मजबूत करणे काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

परभणी तालुक्यातील नांदापूर येथे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकत्रे तथा माजी जिल्हा संघटक वैजनाथराव रसाळ यांच्या मरणोत्तर कार्यगौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, पिढय़ान्पिढय़ा शेतकऱ्यांना लुटण्याच्या इतिहासाला बदलण्याचा प्रयत्न सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केला. त्यानंतर शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी याच विषयावर देशात चळवळ रुजवली, तोच वारसा आज आम्ही चालवत आहोत. चळवळीत काम करताना कार्यकर्त्यांनी केवळ ध्येयवादाला चिकटून न राहता शेती व परिवार सांभाळत चळवळ पुढे नेण्याचे काम करावे. वैजनाथ रसाळ यांनी चळवळीत काम करताना या दोन्ही बाजू सांभाळत परभणी जिल्ह्यात चळवळ वाढवत घराघरांत नेली. त्यांच्या या कार्यशैलीचा वारसा नवीन पिढीतील कार्यकर्त्यांनी जोपासून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचे काम करावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि शेतकरी संघटनेच्या तिन्ही शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, ज्येष्ठ कार्यकर्ते ब. ल. तामसकर, कालिदास आपेट, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, शरद जोशी प्रणीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, अमृत शिंदे, गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्यासह मराठवाडय़ातून संघटनेचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

अनेकांनी जागवल्या आठवणी

या वेळी आपेट यांनीही रसाळ यांच्या चळवळीतील आठवणी सांगितल्या. तर भ्रमणध्वनीवरून कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनीही संदेश दिला. गजानन देशमुख, डॉ. प्रकाश पोफळे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमात प्रा. डॉ. जयंत बोबडे यांनी वैजनाथ रसाळ यांच्या जीवनावर तयार केलेल्या ‘अंगारमळय़ातील निखारा’ या लघुपटाचे सादरीकरण झाले. या वेळी वैजनाथ रसाळ यांचे चिरंजीव अच्युत रसाळ यांनी सपत्नीक संघटनेत कार्य करण्यासाठी संघटनेचा बिल्ला धारण केला. प्रास्ताविक अशोक रसाळ यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष ढगे, तर आभार प्रदर्शन मनोहर रसाळ यांनी केले.