एफआरपी थकवला तर साखर कारखाने बंद पाडणार असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरात १९ व्या उस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वाभिमानीने वेगवेगळे ठराव संमत केले.

उस परिषदेतनंतर राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्यावेळी ते म्हणाले की, “ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी द्यायला उशीर केला किंवा एफआरपी थकवली त्यांच्या विरोधात मी औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ज्यांनी एफआरपी द्यायला १४ दिवसांपेक्षा जास्त उशीर केला त्यांच्याकडून १५ टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. या आदेशाची अमलबजावणी करण्याची मागणी आम्ही साखर आयुक्तांना करणार आहोत ” असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसंच साखर कारखान्यांनी एफआरपी थकवला तर आम्ही कारखाना बंद पाडू असाही इशारा शेट्टी यांनी दिला.

दरम्यान देशात लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांनाही राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी येत्या ५ डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचंही सांगितलं आहे. तसंच महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे शेतकरी देशातील शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात येणार आहे असंही राजू शेट्टी म्हणाले.