पाथरीजवळील देवनांद्रा येथील रेणुका शुगर्सविरोधात भाकपने गुरुवारी मोर्चा काढला. येत्या हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक ठेवू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
रेणुका शुगर्सच्या कार्यक्षेत्रात सुमारे १२ लाख टन ऊस उपलब्ध असून, २० हजार एकर क्षेत्रावर नव्याने ऊसलागवड करण्यात आली. परंतु रेणुका शुगर्स पूर्ण गाळप होण्याआधीच बंद पडल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या कारखान्याकडे ऊस गाळपास न्यावा लागत आहे. पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची रेणुका शुगर्सकडून फसवणूक केली जात आहे. तसेच वाहतूकदारांसोबत करार करून जवळपास १२० वाहनमालकांच्या नावावर परस्पर बँकेतून कर्ज उचलण्यात आले. त्यामुळे वाहनधारक अडचणीत आले. न्यायालयातील प्रकरण पुढे करून कारखाना प्रशासनाने कारखाना बंद ठेवून ऊसउत्पादक व कामगारांवर दबाव निर्माण केला आहे. या कारखान्याबाबत सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप भाकपने केला.
२०१४-१५ या हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना चालवावा, ऊसतोडणी व वाहतुकीचे करार तत्काळ सुरू करून १२० वाहनधारकांच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करावी, उसाला साडेतीन हजार रुपये प्रतिटन भाव द्यावा आदी मागण्या करीत भाकपने राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. पाथरीच्या मोंढय़ातून निघालेला मोर्चा दुपारी कारखान्यावर पोहोचला. कारखाना प्रशासनास निवेदन देण्यात आले. किसन काळे, मुंजाजी लिपणे, तुकाराम िशदे, तातेराव कवडे, सखाराम मगर, दिगंबर काळे, बळीराम िशदे आदींच्या या निवेदनावर सह्य़ा आहेत.