जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचे काम महापौर तृप्ती माळवी यांनी केले असून लाच घेऊन महापौरपदाचा अवमान केला आहे. पण पदाचा राजीनामा न देणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे. म्हणून कोल्हापूरच्या जनतेच्या सहनशिलतेचा अंत न पाहता तृप्ती माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा ९ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेच्या वेळी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढणार, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख दुग्रेश िलग्रस व शिवाजी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, कोल्हापूरच्या प्रथम नागरिक म्हणून मान भूषविणाऱ्या महापौरांकडून लाच घेण्याचा प्रकार हा अशोभनिय आहे. ज्या विश्वासावर जनतेने निवडून दिले होते त्याच विश्वासास तडा देण्याचे काम माळवी यांनी केले असून लाच घेऊन महापौरपदाचा अवमान केला आहे. तसेच पदाचा राजीनामा न देता नीतिमत्ता हरवून बसल्या आहेत. महापौरपदाचा हा अवमान कोल्हापूरची जनता कदापी खपवून घेणार नाही.
विरोधी पक्ष नेतेपदी असलेले मुरलीधर जाधव यांच्यावरही बेटिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेस लागलेली ही कीड नष्ट करून स्वच्छ प्रशासन देण्याकरिता महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.