कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील येराळवाडी तलावात व वडूज परिसरातील गावांसाठी उरमोडी योजनेतून पाणी सोडावे या मागणीसाठी संबंधित लाभक्षेत्रातील जनतेने वडूजमध्ये मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलना दरम्यान, शेतकऱ्यांनी तहसीलदार व उरमोडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातल्याने उरमोडीचे पाणी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
उरमोडी योजनेतून वडूज परिसराचा काही भाग, उंबर्डे, नढवळ, काळेवाडी, पिंपळवाडी मार्गे येराळवाडी तलावात पाणी सोडावे, अशी मागणी होत असताना, उरमोडी योजनेतूनही पाणी सोडण्यात येत होते. मात्र ते उंबर्डे परिसरापर्यंत पोहचत नव्हते. उलट त्या पाठीमागील असणाऱ्या गावांना पाणी देण्याचे आवर्तन होऊनही पाणी पोहचत नसल्याने संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी येथील बाजार चौकापासून मोर्चा काढला. त्यानंतर आयलँड चौकात रास्ता रोको आंदोलन केले. मोर्चाचे नेतृत्व माजी सरपंच अनिल माळी, अनिल गोडसे, डॉ. प्रशांत गोडसे, डॉ. संतोष गोडसे, पृथ्वीराज गोडसे, महेश पवार यांनी केले. यावेळी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ आदी घोषणा देण्यात येत होत्या. रास्ता रोको आंदोलनादरम्यान तहसीलदार विवेक साळुंखे, उरमोडी विभागाचे उपअभियंता पोतदार हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेल्या जुजबी उत्तरांमुळे आंदोलनकर्त्यांच्या भावना तीव्रच राहिल्या. पुढाऱ्यांच्या दबावाला अधिकारी बळी पडत असल्यानेच येराळवाडी तलावापर्यंत पाणी पोहचत नसल्याचा आरोप करीत अधिकाऱ्यांना आंदोलकांनी घेराओ घातला. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात साळुंखे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात उंबर्डेचे सरपंच कुंडलिक पवार, माजी सरपंच बापूराव पवार यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते.