सरकारने घोषित केल्याप्रमाणे २० टक्के भाववाढीनुसार ऊसतोडणी व वाहतूक कामगारांचे मागील हंगामाचे फरक बिल द्यावे, वृद्ध निराधार व भूमिहिन शेतमजुरांना पेन्शन द्यावी यासह विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. रखरखत्या उन्हात जिल्हाभरातून आलेले कामगार मागण्यांसाठी आक्रमक झाले होते.
ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना (सीटू), तसेच शेतमजूर युनियनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कामगारांच्या विविध आठ संघटनांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदविला. नवीन करार तत्काळ करून प्रतिटन साडेतीनशे रुपये तोडणी भाव करा, मुकादमांचे कमिशन व वाहतूक दरात दुपटीने वाढ करा, ऊसतोडणी कामगार कल्याणकारी बोर्डाची अंमलबजावणी करा, शेतमजुरांसाठी कल्याणकारी महामंडळाच्या योजना लागू करा, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून प्रत्येकाला रोजगार मिळेल या साठी कामे उपलब्ध करा, वृद्ध निराधार व भूमिहिन शेतमजुरांना १ हजार रुपये दरमहा पेन्शन द्या, सर्व शेतमजुरांना स्वस्त दरात रेशनचे धान्य द्या, एपीएल कार्डधारकांचे बंद झालेले धान्यवाटप करा आदी मागण्या मोच्रेकऱ्यांनी केल्या. मोर्चामध्ये सीटू, लालबावटा, अंगणवाडी युनियन, शालेय पोषण आहार संघटना, आशा वर्कर युनियन, नगरपरिषद कर्मचारी युनियन, लाल बावटा घर कामगार युनियन, बांधकाम मजूर युनियन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. दत्ता डाके, जिल्हा सचिव कॉ. सय्यद रज्जाक आदी उपस्थित होते.