भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आणि वादग्रस्त आहे, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला निषेध नोंदवला आहे. माझे वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आले असे राम कदम यांचे म्हणणे आहे. मात्र महिला, मुलींबाबत बोलताना राम कदमच नाही तर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी काळजी घेतली पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावतील किंवा समाजात चुकीचा संदेश जाईल असे वक्तव्य करणे गैर आहे असेही रहाटकर यांनी म्हटले आहे.

दहीहंडीच्या दिवशी जमलेल्या युवकांशी संवाद साधत असताना भाजपाचे आमदार राम कदम यांचा ताबा सुटला. उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन असे बेताल वक्तव्य राम कदम यांनी केले. ज्याचे पडसाद दिवसभर उमटत होते. तसेच सोशल मीडियावरही राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आता या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही आपली प्रतिक्रिया देत कदम यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.