मंत्री प्रा. राम शिंदेंवर रोष; विरोधी घोषणा

पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच संत भगवानबाबा यांच्या जन्मभूमीत घेतलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलेले भाजपचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांना मुंडे समर्थकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. राम शिंदे यांचे नाव घेताच समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने एकूण परिस्थिती लक्षात घेता त्यांचे भाषणही झाले नाही. मागच्या वर्षी पायथ्याच्या मेळाव्यात जाहीर शब्द देऊन नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भगवानगडावर मेळावा होण्याबाबत काहीच केले नाही, असा त्यांना विरोध होण्यामागचा अर्थ लावला जात होता. मेळाव्यात मागच्यावर्षी महादेव जानकर यांनी आक्रमकपणे भाषण केले होते. त्यातून अनेक दिवस वाद रंगला होता. यावर्षी त्यांनाही भाषणापासून दूर ठेवण्यात आले होते. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावरील दसरा मेळाव्याला विरोध केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे मेळावा स्थलांतरीत केला. मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मुंडे समर्थकांनी गर्दी केली. मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे काय बोलतात, याबरोबरच कोण कोण उपस्थित राहतील, याची उत्सुकता होती. दरवर्षी भगवानगडावरील मेळाव्याला भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री हजेरी लावत. मेळावा वादग्रस्त झाल्यानंतर मागच्या वर्षीही पायथ्याला पंकजा मुंडे समर्थक नेत्यांनी हजेरी लावली होती. नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी त्यावेळी जाहीरपणे पुढील वर्षी मेळाव्यासाठीची पूर्ण व्यवस्था करून कोणालाही त्रास होणार नाही, असा शब्द दिला होता. मंत्री महादेव जानकर यांनी वादग्रस्त विधाने केल्यामुळे अनेक दिवस राजकीय वाद रंगला होता. यावर्षीही गडावरील मेळाव्याबाबत वाद निर्माण झाला. मात्र वर्षभर नगरचे पालकमंत्री शिंदे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. उलट विरोधाची भूमिका घेतल्याचा आरोप पाथर्डी येथील मुंडे समर्थकांच्या बठकीत करण्यात आला होता. त्यानंतरही राम शिंदे यांनी भगवानगडावर मेळावा व्हावा, यासाठी कसलेच प्रयत्न केले नाहीत. जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय परवानगी नाकारली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर मागील दोन वर्षांत पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खाते काढून राम शिंदे यांना देण्यात आले. तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ओबीसी मंत्रालयाचा पदभारही शिंशदे यांच्याकडेच देण्यात आला आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांचा रोष वाढत गेला. दरम्यान दिल्लीत प्रा. राम शिंदे यांनी मुंडे भगिनींबद्दल केलेल्या टिपण्णीचे वृत्तही समाजमाध्यमातून प्रसारीत झाल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले. सावरगाव येथील मेळाव्यात उपस्थित असलेल्या राम शिंदे यांचे नाव घेताच घोषणाबाजी सुरू झाली. पंकजा यांनीही त्यांच्या नावाचा उल्लेख करताच समर्थक संतप्त झाले. त्यामुळे एकूण परिस्थिती लक्षात घेता पंकजा यांनी राम शिंदे, महादेव जानकर यांची भाषणे झाली नाहीत.