जव्हार नगरपरिषदेची लपवालपवी; ‘रमाई आवास’बाबत दिशाभूल केल्याचा आरोप

लोकसत्ता वार्ताहर

पालघर: जव्हार नगरपरिषदमध्ये समाजकल्याण आयुक्त कार्यालयांतर्गत राबविल्या जाणाऱ्या रमाई आवास योजनेसह इतर योजनांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या तालुका समन्वयक राठोड यांना रमाई आवासचा चुकीचा फायदा घेतलेल्या लाभार्थाची माहिती न दिल्याने ही बाब नगरपरिषद प्रशासन लपवत असून या लाभार्थ्यांला पाठीशी घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन टाळाटाळ करीत आहे.

एका बाजूला नगरपरिषद प्रशासन अशा चुकीच्या लाभार्थीला अभय देत आहे, तर दुसरीकडे याच योजनेअंतर्गत नवीन घरांसाठी नागरिकांनी केलेले अर्ज प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवले आहेत.  लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा लाभ का दिला जात नाही किंवा त्यांच्या दिलेल्या अर्जाचे पुढे काय झाले याबाबतची माहितीही अर्जदारांना दिलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

जव्हार नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये एका लाभार्थ्यांने २०१७- १८ मध्ये रमाई आवास योजनेचा लाभ घेतला होता. हा लाभ घेताना या लाभार्थ्यांने शासकीय नियमानुसार बांधकाम करण्याचे सोडून त्या ठिकाणी अवास्तव बांधकाम केलेले आहे. इतकेच नव्हे या लाभार्थ्यांने त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे ही बांधलेले आहेत. त्यामुळे हा लाभार्थी आर्थिक दृष्टय़ा सक्षम असल्याचे दिसून येत आहे.

आर्थिक दृष्टय़ा सक्षम असल्यामुळे त्याने या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतरही नगरपरिषद त्याच्या कारवाईसाठी चालढकल करीत आहे. या लाभार्थ्यांने या घरकुलाचा ठिकाणी एका व्यावसायिक गाळ्यात स्वत:चा व्यवसाय ही थाटला आहे. हे स्पष्ट दिसत असले तरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी तो व्यवसाय बंद असल्याचे म्हटले होते. लाभार्थ्यांला नगरपरिषद प्रशासन अभय का देत आहे हा संशोधनाचा विषय आहे.

संबंधित लाभार्थी व अतिक्रमणांना काही दिवसांपूर्वी नोटिसा बाजवल्या आहेत. येत्या काही दिवसात पोलीस बंदोबस्तात कारवाई होईल. समाजकल्याण आयुक्त कार्यालयाला रमाई योजनेबाबतचा अहवाल कळवू.

– प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी, जव्हार न.प.