बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या शाब्दीक युद्धामध्ये आता रिपाइचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांनी कंगनावर टीका केली आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनीही मुंबई ही मराठी माणसाचीच आहे…हे मान्य नसेल त्यांनी बाप दाखवावा अशा शब्दांत कंगनावर हल्लाबोल केला आहे. रामदास आठवले यांनी या वादात ट्विट करुन सत्तेत असलेल्या शिवसेनेने धमकी देणं योग्य नसल्याचं म्हटलंय.

लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. कंगनाला RPI संरक्षण देईल असंही आठवले यांनी जाहीर केलं आहे.

कंगनाच्या वक्तव्यावर बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही आपला राग व्यक्त केला आहे. मुंबई शहर हे आमचं घर आहे, राजकारण करायचं असल्यास आपल्या गावी जावून करा अशा शब्दांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी कंगनाला सुनावलं आहे.