19 February 2019

News Flash

नक्षलवाद्यांकडून आंबेडकरवादाचा बुरखा पांघरुन कांगावा

मंत्री आठवले भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यासाठी आज, मंगळवारी नगरमध्ये आले होते

रामदास आठवले

केंद्रीय मंत्री आठवले यांचे मत; भिडेंवरही कारवाई हवी

नगर : माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादाचा बुरखा पांघरुन कांगावा करु नये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शांततावादी होते. आम्ही दलित पँथरमध्ये असताना माओवाद्यांपेक्षा अधिक खतरनाक होतो, त्या वेळी आम्हाला कोणी पकडले नाही. माओवाद्यांचे हिंसक कारवायांशी संबंध असल्यानेच पोलिसांनी त्यांना पकडले आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारच्या कारवाईचे समर्थन केले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे घटनेच्या विरोधात व मनुस्मृतीचे समर्थन करत असल्याने ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे दाखवून देण्यासाठी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही केली.

मंत्री आठवले भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यासाठी आज, मंगळवारी नगरमध्ये आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पकडले गेलेले केवळ माओवादी लिखाण करत होते किंवा विचारवंत होते म्हणून त्यांना पकडू नये, असेही आठवले म्हणाले. भाजप सरकारच्या काळात हिंदुत्वावादी अधिक आक्रमक होत असल्याचा आरोप चुकीचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाना घेऊन पुढे जात आहेत, सरकारने सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनाही पकडले आहे, असा दावाही आठवले यांनी केला. भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढल्याचा आरोपही राजकीय आहे, काँग्रेसच्या काळातही अत्याचार होत होते, दलितांवरील अत्याचार सरकार कोणाचे आहे, हे पाहून होत नाहीत, जातीयवादातून अत्याचार होतात, असे ते म्हणाले.

राहुल गांधी आरोप करण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत, मात्र त्यांच्या आरोपांचे मतांत रुपांतर होणार नाही, २०१९ आम्हीच मोदींच्या नेतृत्वाखाली जिंकणार, महागाईचा मुद्दा असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलिअम मंत्री धमेंद्र प्रधान ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, केंद्र व राज्यांनी कर कमी केले तरी इंधन दर कमी होतील, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्व विरोधक एकत्र आले तरी त्यांच्या बंदला प्रतिसाद मिळालेला नाही, याकडे आठवले यांनी लक्ष वेधले.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल होणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना मंत्री आठवले म्हणाले की, या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी आमचे मंत्रालय प्रयत्न करणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याचा कायदा करावा व ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वाना सवलती लागू कराव्यात, मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहेत, मात्र सत्ता असताना काँग्रेस व राष्ट्रवादीने मराठय़ांसाठी काही केले नाही, असा आरोप त्यांनी केला.

केंद्र व राज्याच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात या भाजपच्या निर्णयाशी आपण सहमत असल्याचे सांगताना त्यांनी त्यामुळे निवडणूक खर्चात बचतच होईल, असा दावा केला. मोदी मजबूत असल्याने आरएसएसच्या हिंदूू अजेंडय़ाने काही फरक पडणार नाही, असेही आठवले म्हणाले.

शिर्डीऐवजी दक्षिण मध्य मुंबई

शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचे मत आपण आता बदलले असून त्याऐवजी दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची व त्या जागेची मागणी भाजपकडे करणार असल्याची माहिती मंत्री रामदास आठवले यांनी दिली. भाजप-सेना एकत्र असतील तर लोकसभेच्या २, स्वतंत्र लढणार असतील तर ४ जागांची तसेच विधानसभेसाठी अनुक्रमे १३ व ३० जागांची मागणी सन २०१९ च्या निवडणुकीत करणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.

First Published on September 12, 2018 12:46 am

Web Title: ramdas athavale supported state government action against naxals