News Flash

रिपब्लिकन ऐक्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे- आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली.

प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले

पुणे :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली. रिपब्लिकन ऐक्याचे नेतृत्व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारावे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी तयार आहे, असे आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन ऐक्य झाले तरी लोकशाही आघाडीमधून बाहेर पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये युती झाली तर दक्षिण मुंबईतून अन्यथा रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचेही आठवले यांनी जाहीर केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पुण्यात झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी धनगर समाजाचे नेतृत्व करण्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या पाश्र्वभूमीवर आठवले म्हणाले, रिपब्लिकन ऐक्य होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना नेतृत्व स्वीकारण्याचा प्रस्ताव द्यावा असा निर्णय झाला आहे. त्यानुसार आंबेडकर यांना हा प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या रिपब्लिकन ऐक्यामध्ये मी कार्याध्यक्ष किंवा सरचिटणीस होण्यास तयार आहे. रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आंबेडकर मला ओळखतात की नाही, हे मला माहिती नाही, पण मी त्यांना ओळखतो. माझे त्यांच्याशी पटते, पण त्यांचे माझ्याशी पटत नाही.

..अन्यथा दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढविणार

भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती कायम राहिली पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये युती झाली, तर दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढविणार आहे. सध्या शिवसेनेकडे हा मतदारसंघ आहे. युती झाली नाही तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आठवले यांनी जाहीर केले. धनगर समाजाच्या आरक्षणालाही त्यांनी पाठिंबा दिला. धनगर समाजासाठी या प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण निर्माण करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

‘आरपीआय’चे अधिवेशन

‘आरपीआय’चे २७ मे रोजी पुण्यात एसएसपीएमएसच्या मैदानावर राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने २५ मे रोजी साहित्यिक आणि विचारवंतांची बैठक होणार आहे. बैठकीत ‘आरपीआय’च्या भवितव्यावर चर्चा केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:28 am

Web Title: ramdas athavale want prakash ambedkar to lead united rpi front
Next Stories
1 लोकशाही रुजविण्यासाठी व्यवस्थेचे सक्षमीकरण महत्त्वाचे
2 बीआरटी पुनर्रचनेचा ७५ कोटींचा खर्च वाया
3 वीज बंद आणि उकाडय़ाने हैराण!
Just Now!
X