रामदास आठवले यांचा इशारा

मुंबई येथील इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असता त्यांनी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे विनाकारण अधूनमधून उठणाऱ्या वावटळीवर विश्वास ठेवूनका, ज्यादिवशी आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. त्यावेळी मी तुमच्यासोबत राहीन, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला दिली.

‘आज आले आमचे भरून मन’, ‘भंडाऱ्यात होत आहे आंबेडकरी संमेलन’ असे म्हणत भाषणाला सुरुवात करीत आठवले म्हणाले, या संमेलनात पक्षभेद विसरून सर्वजण एकत्र आल्याचा आनंद होत आहे. मी आंबेडकरी कार्यकर्ता असून एका कार्यकर्त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आयोजकांचा आभारी आहे. गावागावांत जाऊन प्रचार करा, असेही त्यांनी सांगितले.

आंबेडकरी विचार जागृती समितीच्यावतीने भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलनात ते उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य अनुसूचित जातीजमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल. थुल होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, समता सैनिक दलाचे अध्यक्ष डी.एफ. कोचे, निमंत्रक अमृत बन्सोड, अध्यक्ष जयप्रकाश भवसागर, कार्याध्यक्ष महादेव मेश्राम, संघटन सचिव रूपचंद रामटेके, कोषाध्यक्ष प्रभाकर भोयर उपस्थित होते.