राहाता : विरोधी पक्षांकडून राज्यघटना बदलाच्या अफवा पसरविल्या जात असून हा नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. मी जोपर्यंत तिथे निळा झेंडा घेऊन उभा आहे. तोपर्यंत राज्यघटनेला धक्का लावण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला सत्तेवरून खाली खेचण्याची ताकद आमच्यात आहे असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

राहाता तालुका प्रेस क्लबने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. मधुकर देशमुख, प्रा. राजेंद्र निकाळे, प्रा.विजय शेटे व सार्थक ठाकरे यांचा सत्कार रामदास आठवले यांच्या हस्ते करून त्यांचा गौरव केला त्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ.बाळ ज.बोठे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून नरेश राऊ त फौंडेशनचे सचिव प्रा.लक्ष्मण गोर्डे, प्राचार्य इंद्रभान डांगे उपस्थित होते.

ते म्हणाले की, २०१९ च्या निवडणुका आम्हीच जिंकणार आहोत. कालच्या अविश्वास ठरावातील चर्चेवेळी शिवसेना आमच्याबरोबर राहिली नाही, मात्र शिवसेनेने आमच्या बरोबर राहावे. दलितांवर हल्ले होण्याचे प्रमाण कमी झालेले नाहीत. देशभरात असे हल्ले होत असून नगर जिल्हाही त्याला अपवाद नाही. मात्र असे हल्ले होऊ नये त्यासाठी समाजामध्ये एकता निर्माण करण्याची पत्रकारांवर फार मोठी जबाबदारी आहे. याप्रसंगी डॉ.मधुकर देशमुख, राजेंद्र निकाळे व प्रा. विजय शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी रामदास आठवले व गौरव मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन त्यांचे पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले.  प्रारंभी सतीश वैजापूर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले शेवटी सीताराम चांडे यांनी अभार मानले.