रामदास आठवले यांची खंत

रिपब्लिकन पक्षाने २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती केल्याने भाजपची मतांची टक्केवारी वाढली, परंतु आरपीआयला सत्तेत दहा टक्केवाटा देण्याचे आश्वासन पाळण्यात आले नाही. पक्षाचे कार्यकर्ते अजूनही सत्तेतील वाटय़ापासून वंचित आहेत, अशी खंत रिब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आवठले यांनी येथे व्यक्त केली.

ज्येष्ठ रिपब्लिकन नेते उमाकांत रामटेके यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आठवले आज नागपूरला आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेण्याचे आश्वासन भाजपने पाळले नाही. महामंडळावरील नियुक्तयांमध्येही रिपाइं कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले नाही. पक्षाला योग्य वाटा मिळावा म्हणून भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे, निश्चित पक्षाच्या बाजूने निर्णय होईल अशी आशा आहे, असे आठवले म्हणाले.

रामटेके कुटुंबीयांचे सांत्वन

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत  उमाकांत रामटेके यांच्या निवासस्थानी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. रविवारी रामटेके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आठवले मंगळवारी सकाळी मुंबईहून नागपूरला आले. रामटेके यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रामटेके यांच्या पत्नी प्रभाताई, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर, अमृत गजभिये, राजन वाघमारे, बाळू घरडे, राजू बहादुरे, प्रकाश कुंभे, सतीश तांबे, सुधाकर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. रामटेके यांचे पाचपावलीत स्मारक उभारण्याबाबत राज्यशासनाशी चर्चा केली जाईल, असेही आठवले म्हणाले.