रामदास आठवले यांचा इशारा, पदोन्नतीतील आरक्षणाचे समर्थन

भाजपाने संविधानाला धक्का लावल्यास मी भाजपाची साथ सोडून देईन. असा प्रयत्न झालाच तर आपण सगळे एकत्र येऊ आणि भाजपाचा सत्यानाश करू, असा इशारा सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने शनिवारी कवी सुरेश भट सभागृहात आयोजित आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आचार्य डॉ. लोकेश मुनीश्री, औरंगाबादचे अब्दुल कावी फलाही, पुण्याचे डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले, अ‍ॅट्रासिटी कायदा आणि पदोन्नतीतील आरक्षण हे अलीकडील महत्त्वाचे मुद्दे झाले आहेत. पदोन्नतीतील आरक्षण नाकारले गेले तर लोक आपल्याला जगू देणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ७० वर्षांनंतर मला मंत्री बनण्याची संधी मिळाली. अनुसूचित जाती- जमातीवर दूरगामी परिणाम करतील, असे काही निर्णय न्यायालयातून झाले आहेत. मात्र एससी, एसटींवर अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही संसदेच्या माध्यमातून घेऊ. त्यासाठी रामविलास पासवान, राजकुमार बडोले आणि मी प्रयत्न करीत आहोत.

स्वत:ची स्वत:ला ओळख करून देणे हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धाच्या विश्वाच्या कल्याणासाठी संदेश असल्याचे डॉ. मुनीश्री यांनी  म्हटले. अब्दुल फलाही यांनी इस्लाम म्हणजेच शांती व समता असल्याचे सांगितले.

थायलंडच्या डॉ. सिरीकोतन मनिरीन, विश्वनाथ कराड, गौतम चक्रवर्ती, मंत्री महादेव जानकर, अ‍ॅड. सुलेखा कुंभारे आदींचीही यावेळी भाषणे झाली. फिलिपाईन्सच्या राजकुमारी मारिया अमोर आणि अनेक परदेशी भंते, नागरिक यावेळी उपस्थित होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्र्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचीच चर्चा सभागृहात होती.

कार्यक्रम संघप्रणीत भाजपचा असल्याचा आरोप

समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर आभार मानण्यासाठी उठले. त्यापूर्वीच भदंत ज्ञानज्योती यांनी माईक हाती घेतला आणि हा कार्यक्रम ब्राम्हणवाद्यांचा असून निषेध करीत असल्याचे जाहीर केले. भरगच्च सभागृहात अनेक भाषणे झाल्यानंतर नेमके रामदास आठवले यांच्या भाषणाच्यावेळीच काहींनी व्यत्यय आणला. कार्यक्रम संघप्रणीत भाजपचा असल्याने समता सैनिक दलाच्यावतीने संजय जीवने, वंदना जीवने, श्वेतनिशा टेंभूर्णे, सुनील जवादे, स्मिता कांबळे, नागसेन बागडे, राजेश लांजेवार, संजय पाटील आणि विश्वास पाटील यांनी घोषणा दिल्या. यातल्या काहींना कोतवाली पोलिसांनी अटक केली. अशारितीने कार्यक्रमात व्यत्यय आणणे काही श्रोत्यांना आवडले नाही. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धाच्या नावाने प्रतिघोषणा दिल्या.

विरोधासाठी किमान ५० लोक तरी आणायचे

या कार्यक्रमातील माझ्या भाषणात व्यत्यय आणला गेला. हा व्यत्यय राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये झळकावण्यासाठी होता. पण, त्यासाठी किमान ५० लोक तरी घेऊन यायचे होते. पाच लोक घेऊन आले. आरपीआयमध्ये अनेक गट आहेत. तुम्ही पण त्रासलात आणि मी पण!,  असे वक्तव्य आठवले यांनी  जोगेंद्र कवाडे आणि मंत्री बडोले यांना उद्देशून केले.