रामदास आठवले यांची टीका

‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करत २ – ३ तासांसाठी होणारा नेता हा ‘तमाशातला राजा’ असतो. निवडणुका लढवणे, जिंकणे, सत्ता मिळवणे यासाठी सतत काम करावे लागते, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर येथे पत्रकार परिषदेत टीका केली.

भीमा कोरेगाव घटनेनंतर ‘महाराष्ट्र बंद’ आणि अन्य घडामोडीतून प्रकाश आंबेडकर हे एकदम प्रकाशझोतात आले. दलित चळवळ आणि प्रश्नांचा केंद्रबिंदू आंबेडकर यांच्याभोवती फिरू लागला. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांत आठवलेंसह अन्य नेत्यांकडून याबाबत विविध मते व्यक्त होऊ लागली आहेत. या अंतर्गतच आठवले यांनी वरील टीका केली.

आठवले म्हणाले, की भीमा कोरेगाव घटनेनंतर कुणीही ‘बंद’चे आवाहन केले असते तरी त्यास दलित समाजाकडून प्रतिसादच मिळाला असता. हा प्रतिसाद त्या घटनेच्या निषेधार्थ होता. पण प्रकाश आंबेडकर यांना तो त्या घटनेपेक्षा स्वत:ला असल्याचे वाटू लागले आहे.  यामुळे त्यांना सध्या ‘राजा’झालो असेच वाटते आहे. पण नुसते ‘तमाशातला राजा’ होऊ न चालणार नाही, त्यासाठी सत्ता मिळवली पाहिजे आणि मग राजा झाले पाहिजे. असे २ – ३ तासांसाठी राजा होणे आणि निवडणुका लढवणे, जिंकणे, सत्ता मिळवणे यात खूप फरक आहे. यासाठी सतत काम करावे लागते. जनतेसोबत राहावे लागते. ते प्रकाश आंबेडकरांना जमणार आहे का? अशी खरमरीत टीका आठवले यांनी केली. भीमा कोरेगाव घटनेमागे काही मराठा संघटना असल्याचा आरोप करच आठवले म्हणाले, की याबाबत आंबेडकर यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे.

अगोदर जाती नष्ट करा

आर्थिक निकषावर आधारित आरक्षण देण्याच्या शरद पवारांच्या प्रस्तावावर टीका करताना आठवले म्हणाले, की यासाठी अगोदर जाती नष्ट करा. सर्वाना समान पातळीवर आणा आणि मग आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाच्या गप्पा मारा. हा मुद्दा म्हणजे असलेल्या आरक्षणात नव्या गटाची भर घालण्याचा उद्योग असून आमचा त्यास विरोध राहील.