दलितांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दलितांचे रक्षण करण्यात जर सरकार आणि पोलीस कमी पडत असतील तर दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्या, अशी मागणी रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केले आहे. ते नागपूरात बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भातील मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले. तसेच या घटनेवर बेताल वक्तव्य केलेल्या व्ही.के.सिंह यांच्यावरही आठवले यांनी टीका केली. व्ही.के.सिंह सारख्या नेत्याने अशाप्रकारचे विधान करू नयेत, असे आठवले म्हणाले.

गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे देशातील असहिष्णुता वाढत असल्याची टीका होत असतानाच मंगळवारी हरियाणातील गावात जातीय वादातून दलित कुटुंबावर हल्ल्याची घटना घडली. हरियाणातील सुनपेड गावात उच्चवर्णीय जमावाकडून दलित कुटुंबाचे घर जाळण्यात आले. यामध्ये दलित कुटुंबातील दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून या मुलांचे पालक गंभीररित्या भाजले. हल्ल्याच्या घटनेविषयी केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह वादग्रस्त वक्तव्य केले. दलित कुटुंबातील दोन लहान मुलांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरता येणार नाही. कुणी कुत्र्याला दगड फेकून मारला तर त्यामध्ये सरकारची काय चूक, असे सिंह यांनी यावेळी म्हटले. सिंह यांच्या विधानावरून गदारोळ माजला आहे. सर्व स्तरांतून व्ही.के.सिंह यांच्यावर टीका होत आहे. सिंह यांची मंत्रिमंडळातून हाकलून लावण्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी, असेही काँग्रेसचे म्हणणे आहे.