प्रतीक शिवशरण खून प्रकरण तपासातील दिरंगाई

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील प्रतीक शिवशरण या मुलाचे अपहरण करून निर्घृणपणे खून झाल्याच्या संवेदनशील मुद्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवेढय़ात शिवशरण कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी पोलीस तपास यंत्रणेबद्दल शिवशरण कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत जोरदार तक्रारी केल्या. परंतु या वेळी एकही जबाबदार पोलीस अधिकारी हजर नसल्याने आठवले हे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांवर चांगलेच भडकले.

यासंदर्भात गंभीर दखल घेऊ न पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यावर कारवाई होण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणारा प्रतीक मधुकर शिवशरण (वय ९) या शाळकरी मुलाचे अपहरण झाल्यापासून पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे मंगळवेढा भागात जनआंदोलने होत आहेत. प्रतीकचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस येऊन २० दिवस उलटले तरी पोलिसांना मारेकरी शोधता येत नाहीत. यातच प्रतीकचा खून नरबळीच्या हेतूने झाल्याचा संशय बळावल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे.

प्रतीकच्या मारेकऱ्यांचा तपास लावावा आणि यात सुरूवातीला या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, हा गुन्हा सीआयडीकडे सोपवावा, या मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेसह विविध संघटनांनी आंदोलन चालविले आहे.