शिवसेना जर छगन भुजबळ यांना पक्षात घेत नसेल तर त्यांनी सरळ रिपाइंत यावं अशी ऑफरच रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार म्हणजेच त्यांची घरवापसी होणार अशी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत जाणारे छगन भुजबळ कोणीतरी वेगळे असतील असं म्हणत या चर्चांना स्वतः भुजबळांनीच पूर्णविराम दिला होता. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पुन्हा एकदा या सगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी भुजबळांना रिपाइंची ऑफर दिली आहे.

शिवसेना जर छगन भुजबळ यांना पक्षात घेत नसेल तर त्यांनी रिपाइंत यावं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ज्यांना सेना-भाजपाचा पर्याय निवडायचा नाही त्यांनी रिपाइंचा पर्याय निवडावा असंही आठवलेंनी म्हटलं आहे. छगन भुजबळ हे बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत त्यांचे आणि माझे संबंध फार पूर्वीपासून चांगले आहेत त्यांना शिवसेना पक्षात घेत नसेल तर त्यांनी रिपाइंत यावं ते आरपीआयमध्ये आले तर आरपीआयची ताकद वाढेल असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान अगदी काही दिवसांवर आलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना गळती लागलेली दिसून येते आहे. राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज नेते पवारांची साथ सोडून भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. १ सप्टेंबर रोजीही अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अशात छगन भुजबळ हे देखील शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेने मात्र याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसंच छगन भुजबळ यांनीही शिवसेनेत जाणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता रामदास आठवले यांनी त्यांना रिपाइंमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना ही ऑफर दिली आहे. आता यावर छगन भुजबळ काही प्रतिक्रिया देणार का?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.