“महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात अगोदर मी केलेली आहे. मी ग्रामीण भागातून आल्याने माहीत होतं की, सर्व मराठा समाजातील बांधव हे श्रीमंत नाहीत. गरीब असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गरीब असणाऱ्या मराठा समाजातील व्यक्तींना, अल्पभूधारकांना आरक्षण मिळालं पाहिजे. या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

“मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकून वाद निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. ही मागणी मराठा समाजाची आहे. ओबीसींना आरक्षण कमी मिळाले आहे. त्यात मराठा समाजाला टाकून वाद निर्माण करण्यापेक्षा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं” असे रामदास आठवले यांनी सांगितले.

आणखी वाचा- राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं – रामदास आठवले

“आरक्षणा संबंधी कायदा करायचा असेल तर एकट्या मराठा समजला करता येणार नाही. महाराष्ट्रातील मराठा, हरियाणातील जाट, राजस्थानमधील राजपूत, यूपीमधील ठाकूर, आंध्रप्रदेश येथील रेड्डी आहेत. या सर्व क्षत्रिय जातींना 10-12 टक्के आरक्षण देण्याची मागणी माझ्या पक्षाने केली आहे. यातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. 2021 चा जनगणनेचा सर्वे हा जातीच्या आधारावर करावा, यासंबंधी पंतप्रधानांना मी पत्र देणार आहे. जातीच्या आधारावर जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. ग्रामीण भागात आजही दलितांवर अत्याचार होत आहेत. दलितांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे” असे आठवले म्हणाले.