रामदास आठवले यांचा आरोप

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मीराकुमार यांना उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनवल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. असाच बळीचा बकरा काँग्रेसने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देऊन केला होता. निवडून येणार नाही हे माहीत असूनही मीराकुमार यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, असे आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

भाजपने रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करताना, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांचा वारंवार ते दलित असल्याचा उल्लेख केला, याकडे लक्ष वेधले असता आठवले यांनी काँग्रेसलाच टोला लगावला. आठवले म्हणाले, हा काँग्रेसचा प्रचार आहे. इतकी वर्षे सत्तेवर राहून काँग्रेसनेच जातीयवाद रुजवला आहे. त्यातूनच वाद निर्माण होत आहेत. कोविंद यांची उमेदवारी हा भाजपचा क्रांतिकारी निर्णय आहे. भाजप हा पूर्वीचा जनसंघाचा नाही तर बहुजनांचा पक्ष झाला आहे. परंतु तरीही भाजपने वारंवार असा उल्लेख करायला नकोच होता. सध्या मराठे, जाट, पटेल, ब्राह्मण असे सारेच आरक्षण मागत आहेत, कोणाचे आरक्षण काढून ते आम्हाला द्या, असे ते म्हणत नाहीत, ही सकारात्मक बाजू आहे. मराठय़ांना १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कोर्टात टिकेल असे आपल्याला वाटत नाही. मराठय़ांना आरक्षण द्या, यासाठी सर्वात प्रथम पाठिंबा आपणच दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ामुळे ५० टक्क्यांवर आरक्षण देण्यास बंधन आले आहे, त्यामुळे संसदेने कायदा करून २५ टक्के आरक्षण वाढवावे, त्यातील ९ टक्के आरक्षण ज्या जाती आरक्षण मागत आहेत, त्यांना त्यातून द्यावे, सर्वच पक्ष त्यास पाठिंबा देतील, ज्यांचे उत्पन्न १० लाखांच्या आत आहे, त्यांनाही आर्थिक निकषावर शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण द्यावे, त्यातून कोणत्याच समाजात आरक्षणाचा वाद राहणार नाही, असा नवाच प्रस्ताव आठवले यांनी सादर केला.

सेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही

शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सध्या कोणत्याच आमदारांना निवडणुका नको आहेत. शिवसेनेने कर्जमाफीचे श्रेय घ्यावे, परंतु पाठिंबा काढू नये आणि जरी शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, असे सूतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ‘आमचे नेहमीच वाहतात ऐक्याचे वारे, पण येतात ऐक्याचे वारे, राहतात फक्त नारे’ अशी कविता मंत्री आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याच्या प्रश्नावर सादर केली.