विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये हजेरी लावली आहे. मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित आहेत. यामध्ये महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गिरिश महाजन, उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच भाजपाचे राज्यातील सर्वच प्रमुख नेते या सभेला आवर्जून उपस्थित आहेत. या सभेमध्ये भाजपाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी भाषण केलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही यावेळी भाषण करताना आपल्या शैलीत कविता सादर केला.

आठवले यांनी या सभेमधील भाषणाची सुरुवातच कवितेने केली. ‘महाराष्ट्रात जनादेश यात्रेचं फडणवीसांनी आणलं चंदन, मोदी करणार आहेत विरोधकांचं रणकंदन,’ अशी कविता आठवले यांनी माईक हातात आल्यावर म्हटली. मात्र त्याच क्षणी पंचवटीतील तपोवनातील सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याचे आगमन झाले. मोदींच्या स्वागतासाठी सर्वच नेते स्टेजवर उठून उभे राहिले. सर्व नेत्यांनी मोदींच्ये स्वागत केल्यानंतर आठवले यांनी आणखीन एक कविता करत आपले भाषण आटोपते घेतले. ‘तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बंधन, करतो शिवाजी महाराज आणि बाबासाहेंबांना वंदन,’ असं म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

दरम्यान, त्याआधी पंकजा मुंडे यांनाही भाषणामधून काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘राज्याला राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त करण्याचं स्वप्न आहे. भाजप हा जातीपातीला थारा न देणारा पक्ष आहे’ अस मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटले. तर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस वसंतराव नाईक यांचा साडे अकरा वर्षांचा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस मोडतील,’ असा विश्वास व्यक्त केला.

मोदी यांच्या या जाहीर सभेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये, यासाठी आज (गुरुवारी) नाशिकमधील मद्यविक्री करणारी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच कांद्याच्या कोंडीने शेतकरी वर्गात संताप खदखदत असून त्याचा भडका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उडू नये आणि कांदा हे निषेधाचे हत्यार ठरू नये यासाठी या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तूच नव्हे, तर पिशव्यादेखील आणण्यास मनाई करण्यात आली आहे.