महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीला १०० पैकी किती गुण द्याल असा प्रश्न जनतेला विचारला तर जनता केवळ ३० गुण देऊन नापास करेल असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारला आज वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने विरोधक सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. अशात आता रामदास आठवले यांनीही टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारला ही जनताच १०० पैकी ३० गुण देऊन नापास करेल अशी टीका त्यांनी केली आहे.

महाविकास आघाडीचा एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रात गेल्या वर्षी झाला. शरद पवार हे या महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार आहेत आणि काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत आणण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. खरंतर भाजपा आणि शिवसेना यांनी युती म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावरुन या दोन्ही पक्षांचं फाटलं. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला.

आज महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच भाजपाच्या नेत्यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. आता रामदास आठवलेंनी तर या सरकारला जनताच नापास करेल असं म्हटलं आहे.