स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार बैठकीत केले. रिपब्लिकन ऐक्यासाठी चार पावले मागे येण्याची माझी तयारी आहे. परंतु ऐक्य होणे व टिकवणे ही सर्वच नेत्यांची जबाबदारी आहे. आम्ही चार नेते एकत्र येऊनही आमच्या जागा निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे ५० टक्के तिकिटे इतर समाजाच्या लोकांना द्यावी लागतील. मित्रपक्षांच्या भरवशावर न राहता आरपीआयने आता स्वबळावर लढले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
खासदार आठवले यांच्या नेतृत्वाखाली ‘जाती तोडो, समाज जोडो’ संदेश देणारी यात्रा २६ जानेवारीला कन्याकुमारी येथून सुरू झाली. ही यात्रा मंगळवारी नांदेडमध्ये पोहोचली. या निमित्त शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, अशोकराज कांबळे, शिवाजी भालेराव, गौतम काळे, शिवसेनेच्या जि.प. सदस्या वत्सला पुयड उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भाला आमचा पाठिंबा आहे. त्याच वेळी मराठवाडय़ाला देखील न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे खासदार आठवले म्हणाले. उद्योग, सिंचन प्रकल्प झाले, तरच या भागावर झालेला अन्याय दूर होईल. राज्यात सध्या केवळ १६ ते १७ टक्के सिंचन प्रकल्प झाले आहेत. प्रत्यक्षात ६० ते ७० टक्क्य़ांपर्यंत सिंचन व्हायला पाहिजे होते. वेळेत प्रकल्प पूर्ण होत नाहीत. त्यामुळे प्रकल्पांची किंमत वाढत जाते. दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने राज्याला मदत करण्याची गरज आहे. आणखी ३ हजार कोटी रुपये दुष्काळ निवारणासाठी केंद्राने राज्याला द्यावे, अशी आमची मागणी आहे.