‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला एकदा काय, दहावेळा जरी गेले तरी मंदिर बनू शकत नाही’, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल, उद्धव ठाकरेंच्या जाण्याने काही होणार नाही असंही रामदास आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे पुन्हा एकदा 16 जून रोजी प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची देशभरात चर्चा सुरू आहे. या दौऱ्यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘उद्धव ठाकरे हे दहावेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल’, असं आठवले यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे, त्यांना राम मंदिराची मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायदा हातात न घेता, राम मंदिर बांधणे ही सरकारची भूमिका आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असून उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही, असे आठवलेंनी म्हटले आहे.

‘शिवसेना खासदार उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जात आहेत, त्यांना शुभेच्छा. लोकांच्या भावनांचा विचार केला तर राम मंदिर व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. हिंदू समाजाला जी जागा मिळेल, त्यात राम मंदिर बांधायला हवं. मात्र उद्धव ठाकरे त्याठिकाणी एकदा गेले काय आणि दहा वेळा जरी गेले, तरी त्यांच्या जाण्याने काही होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच तिथे राम मंदिर बनू शकतं’, असे आठवले म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आलेत. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खासदार आणि कुटुंबासह कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. आता ते १६ जूनला अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत.