महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘तुम्हीच प्रमुख’ असे म्हणत माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या खांद्यावर पालकमंत्री रामदास कदम यांनी हात ठेवला आणि त्याच वेळी सांगितले, ‘खैरे माझ्या डाव्या बाजूला व त्यांचा मुलगा उजव्या बाजूला.’ त्यामुळे आमच्यात मतभेद नाहीत, असे जाहीर विधान पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. दिवसभरातील सर्व ठिकाणच्या सार्वजनिक कार्यक्रमात खैरे व माझ्यात मतभेद नाहीत, असे पालकमंत्री सांगत होते.
शिवजयंती महोत्सव समितीच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री रामदास कदम एका व्यासपीठावर होते. काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका खैरे यांनी घेतली होती. हैदराबाद मुक्तिसंग्राम-मराठवाडय़ाची अस्मिता या संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी कदम यांनी खैरे यांच्यावर जाहीर टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर झालेल्या या टीकेमुळे कदम यांना खैरे यांचे पंख कापण्यासाठीच पाठविले आहे, असा संदेश शिवसैनिकांमध्ये गेला होता.
त्यानंतरच्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये खैरे यांच्या वादाची चर्चा शिवसैनिकांमध्ये असे. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खासदार खैरे यांना निर्णयप्रक्रियेतून बाजूला केले जात असल्याचा संदेश पालकमंत्री देत आहेत, असे पक्षांतर्गत सांगितले जात होते. या पाश्र्वभूमीवर शहरातील दोन सार्वजनिक कार्यक्रमांत व पत्रकार बैठकीत खैरे आणि माझ्यामध्ये मतभेद नाहीत, असे कदम यांना वारंवार सांगावे लागले. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्याला बाजूला ठेवून निवडणुका लढविणे जड जाईल, असे सांगण्यात आल्याने ही दिलजमाई झाल्याचे सांगितले जाते.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या व्यासपीठावर पालकमंत्री कदम यांचा युवा सेनेचे अध्यक्ष हृषीकेश खैरे यांनी सत्कार केला. या वेळी कदम म्हणाले, की आमच्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पडद्याआड काहीच चालत नाही. आम्ही कधीकधी ‘हंसी-मजाक’ करतो. तो जाहीरपणे असतो. आमच्यात मतभेद नाहीत. याच आशयाची वाक्ये महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही त्यांनी उच्चारली. पत्रकार बैठकीतही आमच्यात मतभेद नाहीत. तुम्ही ते निर्माण करू नका, असेही ते म्हणाले. गोवंशहत्या बंदी विधेयकाची राज्यात कडक अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील १४४ कत्तलखाने आठ दिवसांच्या आत बंद करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘समांतर’चे काम आठ दिवसांत सुरू
समांतर जलवाहिनीचा ठेकेदार कामच करीत नसल्याने महापालिकेने त्याला बडतर्फ करण्याची अंतिम नोटीस दिली असताना मंत्री कदम यांनी समांतरचे काम येत्या आठ दिवसांत सुरू होईल, तसे ठेकेदाराला कळवल्याचे ते म्हणाले. शिवसेनेने समांतरप्रश्नी पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. ठेकेदाराला ठेवायचे की काढायचे यावरून मतभेद होते. खासदार खैरे व त्यांचे समर्थक ही योजना न झाल्यास पुन्हा एवढा निधी येणार नाही, असे सांगत होते, तर शिवसेनेतीलच एक गट ही योजना रद्द नाही केली तर महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसेल, असे सांगत होता. या पाश्र्वभूमीवर कदम यांनी ठेकेदाराला पुन्हा काम करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई
खाम नदीत विषारी रसायने टाकणारी टोळी कितीही मोठी असली आणि कितीही मोठा नेता त्यात सहभागी असला तरीदेखील कडक कारवाई होईल. नदी प्रदूषणाविरोधात काहीही खपवून घेणार नाही, असेही कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. भाजपचे नगरसेवक आगाखान व मनसे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यावर खाम नदीत टँकरने रसायन टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यांना अटकही झाली. या दोन्ही पदाधिकाऱ्यांची मनसे व भाजपमधून हकालपट्टीही करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर पर्यावरणमंत्री म्हणून प्रतिक्रिया देताना कडक कारवाई होईल, असे सांगितले.
‘नाव घेतले नाही असे म्हणाल’!
जाहीर कार्यक्रमात शिवसैनिकांना छत्रपती शिवाजीमहाराज आमचे दैवत आहेत, असे सांगत रामदास कदम यांनी मतभेदाचे चित्र तसे नाहीच, असे सांगण्याचा प्रयत्न केला. महापौर कला ओझा यांचे नाव भाषणापूर्वी त्यांनी घेतले नव्हते. तसे ते कोणाच्या लक्षातही आले नव्हते. मात्र, स्वत:हूनच मंत्री म्हणाले, महापौर ओझा यांचे नाव घ्यायचे राहिले आहे. नाहीतर त्या म्हणतील, ‘माझे नाव घ्यायचे पालकमंत्र्यांनी टाळले’!