पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रशासनाला दिलेले आदेश पाळले जात नाहीत, असे का होते, असा प्रश्न विचारला आणि पालकमंत्री वैतागले. रस्त्यासाठी ५४ कोटी रुपये आणले. काम वेगात सुरू आहे. मात्र, काही जणांनी जाणीवपूर्वक आपल्या विरोधात मोहीम उघडली असल्याचा संशय व्यक्त करत पालकमंत्री म्हणाले, ‘मी चांगले काम करतो आहे!’
 जलस्वराज्य योजनेतील ठेकेदारांनी कमी दराच्या निविदा भरल्या होत्या. त्यामुळे कामाच्या दर्जावर परिणाम होईल म्हणून ही कामेच रद्द करा, असे पालकमंत्र्यांनी फर्मावले होते. मात्र, ती कामे थांबविण्यात आली नाहीत. या अनुषंगाने अधिकारी पालकमंत्र्यांचे आदेश ऐकत नाहीत काय, असे विचारले असता पालकमंत्री कदम वैतागले. तेव्हा मी जलस्वराज्यची कामे थांबवा, असे म्हणालो नव्हतो, तर कमी दराने स्वीकारलेल्या निविदांमुळे दर्जावर परिणाम होतो. ज्या कामांच्या निविदा अजून निघाल्या नाहीत, अशी कामे थांबवा, असे त्या वेळी म्हणाल्याचे कदम यांनी सांगितले. याच प्रश्नाला जोडूनच पैठण तालुक्यातील विहिरींचा प्रश्नही विभागीय आयुक्तांनी रविवारी निकाली काढल्याची माहिती दिली.
 पैठण तालुक्यात बांधण्यात आलेल्या विहिरींचे अनुदान देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, ती रक्कम मिळाली नाही, असे सांगत पुन्हा एकदा विहिरीत उतरून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात शेतकरी आहेत. या पाश्र्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह लावले जात होते. यावर बोलताना ते म्हणाले, ‘बेकायदेशीर विहिरी बांधायच्या आणि मग नाक दाबून तोंड उघडायचे. तरी देखील शेतकऱ्यांच्या रकमा द्यायला हव्यात, ही भूमिका आहे. मात्र, विहिरींच्या कामात गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही. एक हजार विहिरींचे अंदाजपत्रक होण्यासाठी थोडासा वेळ लागला असेल, मात्र आज विभागीय आयुक्तांनी ते प्रकरण निकाली काढले आहेत.’
शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची मोहीम मी हाती घेतली होती. त्याला आता गती आली आहे. काम सुरू झाले आहे. फरक दिसू लागला आहे, पण तो तुम्ही मान्य करणार का, असा सवालही त्यांनी पत्रकार बैठकीत केला. शहरातील घाटी रुग्णालयात एमआरआयसाठी बीपीएलच्या व्यक्तींना द्यावा लागणारा अधिकचा निधी जिल्हा नियोजनमधून देण्याचे नियोजन केले जात आहे. तो एक प्रश्न वगळता दिलेली आश्वासने पूर्ण करत असल्याचा दावा पालकमंत्री कदम यांनी केला.