रामदेवबाबांचे वक्तव्य

फक्त नरेंद्र मोदींना ओळखतो, पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींनी फसवणारे नीरव मोदी आणि आयपीएल घोटाळ्यातील ललित मोदी यांनी देशाची प्रतिमा मलीन केली आहे. नीरव मोदीवर कारवाई होऊन सरकार त्याला तुरुंगात पाठवेल  आणि त्याच्याकडून पैशाची वसुली करेल, असा विश्वास योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

चंद्रपूर येथे योग शिबिराला जाण्यासाठी स्वामी रामदेवबाबा नागपुरात आले असता ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या प्रगतीसाठी काम करीत असल्यामुळे त्यांना मी ओळखतो, मात्र इतर दोन मोदींची मला माहिती नाही. नीरव आणि ललिद मोदी यांनी  देशाला बदनाम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी. नीरव मोदी यांनी भ्रष्टाचार केला आहे, पण प्रकरण एकाएकी समोर कसे आले?  ते देश सोडून कसे गेले?  याची सरकारने चौकशी करावी. त्यांची भारतातील सर्व संपत्ती सरकारने जप्त करावी. मात्र, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोषी ठरवता येणार नाही, असे रामदेवबाबा म्हणाले.

मिहानमधील पतंजलीचा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल आणि याच वर्षी संत्र्याचा रस लोकांना प्यायाला देऊ. विदर्भातील एकही संत्रा वाया जाणार नाही.  डिसेंबर महिन्यात उत्पादन सुरू होईल. नागपूरसह मध्य प्रदेशातील संत्रीसुद्धा आम्ही खरेदी करू, असा विश्वास रामदेवबाबा यांनी व्यक्त केला. मिहानमधील जमिनीच्या हस्तांतरणास उशीर झाल्याने नियोजित वेळेत प्रकल्प सुरू होऊ शकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूरला आयोजित योग शिबीर सरकारच्या पैशातून नाही तर सामाजिक संस्थांच्या मदतीने करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी विदेशातील गुंतवणूक भारतात यावी म्हणून प्रयत्न करतात तर नीरव मोदीं सारखे लोक बॅंकांचा पैसा घेवून पळून जातात,अशी टीका रामदेवबाबा यांनी येथे केली. श्रमिक पत्रकार संघाव्दारे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.