योग शिबिराच्या निमित्ताने जालना शहरात आलेल्या रामदेवबाबांनी, आपण भाजप प्रायोजित साधू नसल्याचे सांगितले होते खरे. परंतु पुढील चार दिवसांतील त्यांचे वास्तव्य भाजप आणि प्रामुख्याने शिबिराचे आयोजक असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे राजकीय महत्त्व वाढविण्यास साह्य़भूत ठरणारेच होते. शिबिराच्या आयोजनात दानवे यांच्या कार्यकर्त्यांचाच मोठा सहभाग होता.

जालना शहरातील तीन दिवसांच्या शिबिराच्याव्यतिरिक्त भोकरदन येथील शेतकरी मेळाव्यास रामदेव बाबांची उपस्थिती होती. भोकरदन हे खासदार दानवे यांचे प्रभावक्षेत्र असून हा भाग त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात मोडतो. याशिवाय भोकरदन विधानसभा मतदारसंघात खासदार दानवे यांचे चिरंजीव संतोष सध्या आमदार आहेत. भोकरदनच्या मेळाव्यात खासदार दानवे यांनी शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करून त्यास मागील सरकारची धोरणे कारणीभूत असल्याचे सांगितले. सध्याचे राज्यातील सरकार शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे राजकीय भाषणच केले.

जालना येथील पत्रकार परिषदेत जेव्हा आपल्यामुळे दानवे मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर आपल्या आगमनाने दानवेंचा लाभ होणार असेल तर इतरांना त्रास होण्याचे कारण काय, असा प्रतिसवाल रामदेवबाबांनी केला. नोटाबंदी, जीएसटीचा विषय निघाल्यावर ते मोदींचे राजकीय कौशल्य असल्याचे ते म्हणाले. बाहेरच्या देशातील काळा पैसा कमी प्रमाणावर आला असून हे कठीण असले तरी प्रयत्न मात्र अवश्य होत आहेत, असे प्रमाणपत्र रामदेवबाबांनी केंद्र सरकारला दिले.

पतंजलीने नागपूरमध्ये संत्राप्रक्रिया प्रकल्प उभारणीची घोषणा केली. त्याप्रमाणे जालना जिल्ह्य़ात मोसंबी प्रक्रिया प्रकल्प सुरू होईल, अशी अपेक्षा योग शिबिराच्या निमित्ताने व्यक्त केली जात होती. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी निश्चित काही सांगितले नाही. भोकरदन येथील शेतकरी मेळाव्यात खासदार दानवे यांनी मका प्रक्रिया प्रकल्पाची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यावर बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, मोसंबी प्रक्रिया प्रकल्पाचा विषयही या आधी निघाला होता आणि येथे मका प्रक्रिया  प्रकल्पाचा विषय आलेला आहे, त्यादृष्टीने विचार करता येईल. विषमुक्त अन्नधान्य व फळांच्या उत्पादनासाठी सेंद्रीय शेती, वनौषधी, कोरफड, दुग्ध व्यवसाय इत्यादी करण्याचे आवाहन त्यांनी केले. रासायनिक खते, औषधी आणि दारूवर शेतकऱ्यांनी खर्च करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

रामदेवबाबांचे शिबीर असले तरी खासदार दानवे हेच चर्चेच्या केंद्रस्थानी होते. शिबिराच्या आयोजनात तेच सर्वेसर्वा होते. इतर पक्षांची काही नेतेमंडळी योग शिबिरास हजेरी लावून गेली तरी ती दानवेंच्या निमंत्रणामुळे एक उपचार म्हणून येऊन गेली असेच म्हणावे लागेल. विधानसभेच्या दोन आणि लोकसभेच्या चार अशा सलग सहा निवडणुका जिंकणारे खासदार दानवे यांचे हे राजकीय शक्तिप्रदर्शनच होते. त्यामुळे या आयोजनाचे श्रेय इतर कुणाला दूरान्वयानेही मिळू नये याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली होती.

रामदेव बाबांच्या शिबिरामुळे जनतेचे आरोग्य किती सुधारेल हे सांगता येणार नाही. परंतु त्यानिमित्ताने खासदार दानवे यांनी स्वत:चे राजकीय वजन अधिक वाढविण्याचा प्रयत्न जिल्ह्य़ात केल्याचे दिसून आले.

योग शिबिरात गैर काय?

खासदार दानवे यांच्यामुळे झालेले रामदेवबाबा यांचे योग शिबीर जालनाकरांसाठी महत्त्वाचे ठरले. दानवे यांनी आयोजित केलेले शिबीर आणि शेतकरी मेळाव्यात कोणतेही राजकारण नव्हते. परंतु विरोधकांना मात्र खासदार दानवे यांच्यावर टीका करण्यासाठी काही तरी निमित्त लागत असते. आरोग्यासाठी योग शिबीर घेतले तर त्यामध्ये गैर काय?

रामेश्वर भांदरगे, भाजप जालना जिल्हा अध्यक्ष शेतकरी नव्हे,

भाजप मेळावा

भोकरदनच्या शेतकरी मेळाव्यात रामदेवबाबा शेतकऱ्यांबद्दल कमी आणि योगाबद्दलच अधिक बोलले. खरे तर हा भाजपचाच राजकीय मेळावा होता. कारण यावेळी रामदेवबाबांनी तटस्थ राहण्याऐवजी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांना पुन्हा सत्तेवर येण्यासाठी जाहीर आशीर्वादच दिले. रामदेवबाबांनी शेतीसोबतच दारूचाही जो उल्लेख केला त्याची चर्चा मात्र सध्या सुरू आहे.

चंद्रकांत दानवे, माजी आमदार राष्ट्रवादी.