विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा सूचक इशारा

रामराजेंवर बोलेल तो मोठा होतो असे अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे भुंकण्याचे प्रमाण वाढले आहे. आता गद्दारांना बाहेर काढण्याचा निर्णय पक्ष घेईलच, असा इशारा विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिला.

विधानपरिषदेवर सभापती म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल रामराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष सुभाष नरळे यांचा दहिवडी येथे सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार प्रभाकर घार्गे, आमदार दीपक चव्हाण, वाघोजीराव पोळ, श्रीराम पाटील, वसंतराव जगताप, बंडा गोडसे, गणेश शिंदे यांची उपस्थिती होती.

रामराजे म्हणाले, की दिवंगत सदाशिवराव पोळ यांच्याबरोबर आमचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. त्यामुळे उंची नसणाऱ्यांना आमचे संबंध काय माहीत असणार. माझ्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले. अशा भुंकणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. ज्यांना लाज नाही त्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये. गद्दारांना आता पक्षाबाहेर काढू. तुम्ही खरेच तात्त्विक असाल तर किमान आता तरी राजीनामा द्यावा अशी परखड टीका त्यांनी केली. माण तालुक्यात २००९ नंतर मोठय़ा प्रमाणात वाटप केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे राजकारणाची दिशा बदलून गेली आहे. स्वाभिमानाने लढणारा लाचार झाल्याने जिद्द व आत्मविश्वासाने गमावून बसला आहे. कार्यकर्त्यांनी वाटपात भाग न घेता आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.