सतीश कामत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या कोकणातील राजकीय वातावरण पेटले असून माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेशी रस्त्यावर संघर्षांचा पवित्रा घेतला आहे.

कोकणची सुभेदारी मिरवणाऱ्या शिवसेनेला कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे नीलेश व नीतेश हे दोन चिरंजीव गेली सुमारे १५ वर्षे आव्हान देत आले आहेत.

२००५ मध्ये राणे कॉँग्रेसवासी झाले तेव्हापासून २०१७ पर्यंत सिंधुदुर्गात काँग्रेस पक्षाने सेनेला रोखले. त्यानंतर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपर्यंत स्वत: राणेंनीच स्थापन केलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ही भूमिका बजावत राहिला; तर भाजपामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर राणेंच्या माध्यमातून भाजपा सेनेसाठी मुख्य आव्हान उभे करत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही त्याची झलक पाहायला मिळाली.

या १५ वर्षांंच्या वाटचालीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. उणी-दुणी काढली गेली. दुय्यम पातळीवरील कार्यकर्त्यांंमध्ये मारामाऱ्यांचेही प्रसंग घडले. आमदार-खासदारांच्या पातळीवर मात्र वातावरण फारसं बिघडलं नव्हतं.

पण राणेंनी स्थापन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या ७ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात आले आणि त्यानंतर सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून वातावरण इतकं तापत गेलं की, एकमेकांना फटकावण्याच्या धमक्या देत पुतळे जाळण्यापर्यंत दोन्ही बाजूंची मजल गेली. अर्थात तपशील पाहू गेलं तर प्रथम खासदार राऊत यांनीच कुरापत काढली.

शहा यांचे वक्तव्य आणि शिवसेनेची प्रतिक्रिया

शहांनी कार्यक्रमात भाषण करताना राणेंसारख्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नेत्याचा सन्मान कसा करायचा, हे भाजपा नीट जाणतो, असं वक्तव्य केलं. त्यामुळे राज्यसभेचे खासदार असलेल्या राणेंना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत  खासदार राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता, राणेंसारख्या ‘नॉन मॅट्रिक’ व्यक्तीला हे पद देण्याची वेळ यावी, हे दुर्दैव आहे, अशी टिप्पणी  केली. त्यावर भाजपाचे नुकतेच प्रदेश सचिव बनलेले राणेंचे थोरले चिरंजीव नीलेश संतापले आणि खासदार राऊत यांना भेटतील तेथे फटकावण्याची धमकी त्यांनी दिली. यावरून स्वाभाविकच दोन्ही बाजूंनी चढत्या क्रमाने वक्तव्यं आणि निदर्शनं होत गेल्याने वातावरण आणखीच बिघडलं. पण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी, दोन्ही बाजूंच्या नेत्यांना संयमाचं आवाहन करत तूर्त तरी सामोपचाराची भूमिका घेतली आहे. अर्थात ती कितपत टिकेल याबाबत शंका आहे. कारण कोकणात सेनेची सद्दी संपवण्यासाठीच भाजपाने राणे पिता-पुत्रांना पक्षामध्ये घेत पदेही दिली आहेत. त्यामुळे ती त्यांची नैसर्गिक जबाबदारी बनली आहे. त्याचबरोबर, राणेंना सेनेव्यतिरिक्त अन्य कोणीच अंगावर घेऊ शकत नाही, अशी राजकीय परिस्थिती आहे. शिवाय, सेनेचीही ती राजकीय गरज आहे. त्यामुळे आगामी काळात कोकणात राणे विरुद्ध सेना, हा संघर्ष वाढत राहणं अटळ दिसत आहे.

कोकणची सुभेदारी मिरवणाऱ्या शिवसेनेला कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे नीलेश व नीतेश हे दोन चिरंजीव गेली सुमारे १५ वर्षे आव्हान देत आले आहेत. त्यामुळे ते ज्या पक्षात असतील तो शिवसेनेचा मुख्य प्रतिस्पर्धी बनतो. भाजपामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर राणेंच्या माध्यमातून भाजपा सेनेसाठी मुख्य आव्हान उभे करत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही त्याची झलक पाहायला मिळाली.