वेंगुर्ले नगराध्यक्ष निवडणूक
वेंगुर्ले नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार पूजा कर्पे यांच्या विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गड फोडण्यात राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यशस्वी झाल्याचे चित्र आहे.
या नगरपालिकेमध्ये मागील निवडणुकीत १७ पैकी १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकून भक्कम बहुमत मिळवले. त्यावेळी नगराध्यक्ष झालेल्या नम्रता कुबल यांच्या राजीनाम्यामुळे काल निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अन्नपूर्णा नार्वेकर यांचा बंडखोर कर्पे यांनी पराभव केला. निवडणूक निकालानंतर कर्पेसह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राणेंची भेट घेतली. या पुढील काळात आपण सावंतवाडी नगर परिषदेत लक्ष घालणार असल्याचे राणेंनी या वेळी जाहीर केले. तेथे सध्या सर्व सदस्य (१७) राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे या पक्षाचा एकछत्री अंमल आहे. वेंगुर्लेपाठोपाठ तेथेही सुरुंग लावण्याचा राणेंचा मनोदय राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणखी एक धोक्याचा इशारा आहे.
राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शिवसेनेचा दबदबा संपुष्टात आला. पण वेंगुर्ले-सावंतवाडी पट्टय़ात राष्ट्रवादी काँग्रेसने पकड कायम ठेवली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार दीपक केसरकर आणि कणकवलीचे युवा नेते संदेश पारकर यांचा त्यामध्ये मोठा वाटा राहिला. मध्यंतरीच्या काळात राणेंनी पारकरांनाच काँग्रेस पक्षात ओढून तेथील विरोध संपवून टाकला. पण केसरकरांनी सर्वशक्तीनिशी हा गड अभेद्य ठेवला होता. मागील नगर परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी राणेंची अजिबात डाळ शिजू दिली नव्हती. तरीसुद्धा राष्ट्रवादीमधील नाराज, असंतुष्टांना हेरत आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न राणेंनी चालूच ठेवले होते.
 वेंगुल्र्याचे सभापती अभिषेक मचणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच जिल्हा परिषद सदस्य त्यामध्ये अडकले, तर मावळत्या नगराध्यक्षांनी या निवडणुकीत बंडखोर गटाचे नेतृत्व करत राणेंच्या प्रयत्नांना आणखी यश मिळवून दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव कोकणातील आहेत. पण त्यांचे केसरकरांशी फारसे सख्य नाही. जाधवांनी अखेरच्या क्षणी जारी केलेल्या व्हीपला बंडखोरांनी जुमानले नाही. केसरकरांची कार्यशैलीही या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका राणे पिता-पुत्रांच्या दृष्टीने राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या आहेत. जिल्ह्य़ाच्या राजकारणात मुरलेल्या राणेंना त्यातील आव्हानांची, अडचणींची पुरेपूर जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी गेल्या काही काळापासून जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसची सद्दी संपवण्याचे डावपेच सुरू केले आहेत आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरत असल्याचे वेंगुल्र्याच्या नगराध्यक्ष निवडणुकीने अधोरेखित केले आहे.
या घडामोडींची दखल घेत भावी काळात वेगळ्या पद्धतीने पक्ष संघटना हाताळण्याचे संकेत केसरकरांनी दिले आहेत. यापूर्वी त्याबाबत दुर्लक्ष झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. पण त्यासाठी आधीच थोडा उशीर झाला आहे. या पुढील काळात आपल्या कार्यशैलीमध्येही बदल करून सावंतवाडी नगर परिषदेचा कारभार त्यांनी चालवला नाही तर बैल गेला आणि झोपा केला, अशी स्थिती ओढवण्याची शक्यता आहे.