काँग्रेसमधील नाराज नेते आणि कट्टर राणेसमर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाहता असल्याचे त्यांनी म्हटले असून उद्धव ठाकरे यांनी देखील मला शिवसेनेत परतण्याचे आवाहन केल्याचा दावा कोळंबकर यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार कालिदास कोळंबकर यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून यात त्यांनी काँग्रेसला रामराम करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, माझी आमदारकीची सातवी टर्म आहे. काँग्रेसच्या काळात माझ्या मतदारसंघातील कामे होत नव्हती. बीडीडी चाळीचा महत्त्वपूर्ण मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकाली काढला. बीडीडी चाळीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात मी जाहीरपणे मुख्यमंत्र्याचे कौतुक केले होते. माझ्या मतदारसंघातील काम केल्याबद्दल मी कौतुक केले. यात गैर काय ?, असा सवाल त्यांनी विचारला. काँग्रेसमधील लोकांनी माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेसच्या फलकांवरुन माझा फोटो काढण्यात आला. मग माझ्या बॅनरवर मी त्यांचे फोटो का लावू, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुंबईतील सर्वात ज्येष्ठ आमदार मी आहे. माझ्या मतदारसंघातील कामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. माझं काम जो करणार त्यानुसार मी निर्णय घेईन. शेवटी जनतेला काम हवे आहे आणि नायगावच्या जनतेने यासाठीच विश्वासाने मला मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्या पक्षात जाणार या प्रश्नावर ते म्हणाले, मी आधीपासूनच देवेंद्र फडणवीस यांचा चाहता आहे. ते विरोधी पक्षाचे नेते असतानाही मी त्यांचा चाहता होतोआणि मी त्यांचा मित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मला कालिदास जुन्या वाटेवर परत या, असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, नेमकं कोणत्या पक्षात जाणार, याचे थेट उत्तर देणे त्यांनी टाळले.

कालिदास कोळंबकर हे कट्टर राणेसमर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपात जाणार, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कोळंबकर यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rane supporter congress mla kalidas kolambkar may join shiv sena or bjp
First published on: 25-09-2018 at 15:01 IST