कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवून शिवसेनेला जोरदार धक्का दिला. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या प्रतिष्ठेला धक्का दिल्याने शिवसेनेला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले.

शिवसेना व भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची खुमखुमी पूर्ण केली. त्यामुळे भाजपाने एक जागा पटकावत झेंडा फडकविला.

कुडाळ नगरपंचायत निवडणूक १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात होते. आज मतमोजणीनंतर १७ जागी- काँग्रेस ९, शिवसेना ६, भाजपा १ व अपक्ष एक असे उमेदवार विजयी झाले. अपक्ष उमेदवार शिवसेना समर्थक असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेच्या ७ जागा विजयी ठरल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. राणे यांचा विधानसभा निवडणुकीत आमदार नाईक यांनी पराभव करत कुडाळ शहरातून मताधिक्य मिळविले होते. मात्र काँग्रेसने ग्रामपंचायतीची सत्ता नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत कायम राखत शिवसेना व भाजपाला चपराक दिली.

शिवसेना व भाजपाने स्वबळ अजमाविण्याच्या नादात सत्ता गमावली. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीला दोन जागा देत आघाडी करत सत्ता राखताना राष्ट्रवादीला मात्र खातेही उघडू दिले नाही. मनसेने काही जागांवर उमेदवार दिले, पण त्यांचा पराभव झाला.

काँग्रेस आघाडीचे नेते नारायण राणे. आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी तर शिवसेनेच्या पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी प्रचार रणधुमाळीत भाग घेतला. मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे प्रचारात होते.

भाजपाने कल्याण डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण प्रचारात उतरविले होते. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल काळसेकर, प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रचाराची रणधुमाळी केली, पण भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले. पण शिवसेना-भाजपा युती झाली नसल्याने काँग्रेस सत्तेच्या सारीपाटात विजयी झाले.

कुडाळ नगरपंचायतीत विजयी उमेदवार- महेंद्र वेंगुर्लेकर (शिवसेना), ओंकार तेली (काँग्रेस), देवानंद काळप (शिवसेना), सुनील बांदेकर (काँग्रेस), अश्विनी गावडे (काँग्रेस), अनंत धडाम (काँग्रेस), सरोज जाधव (काँग्रेस), एजाज नाईक (अपक्ष), श्रेया गावडे (शिवसेना), गणेश भोगटे (शिवसेना), साक्षी सावंत (काँग्रेस), संध्या तेरसे (काँग्रेस), उषा आठले (भाजपा), मेघा सुकी (शिवसेना), सायली कुंभार मांजरेकर (काँग्रेस), प्रज्ञा राणे (शिवसेना), विनायक राणे (काँग्रेस).

शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, भाजपाचे  काका कुडाळकर व शिवसेनेचे संजय पडते यांच्या पत्नीचा पराभव झाला. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने शिवसेनेचे सत्तेचे मनसुबे उधळले गेले.

दोडामार्ग, वैभववाडीनंतर कुडाळ नगरपंचायतीत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली.