लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकार घालवले. आता महाराष्ट्रातून आघाडी सरकार घालवणे हा महायुतीचा अजेंडा आहे. राज्यात महायुतीचे सरकार आणून दुष्काळी जनतेसाठी दुष्काळ निवारण आयोग आणि ऊस उत्पादकांसाठी सी. रंगराजन  समितीच्या शिफारशी लागू करून घेणे, हे मुख्य ध्येय असल्याचे सांगताना, कृत्रिम संकटे आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून घालवण्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. दुष्काळी भागासाठी थोडेफार काम केले, त्या दुष्काळी जनतेने जे भरभरून प्रेम दिलं ते मी कदापि विसरणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
वडूज येथे महायुतीच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भगत, दिलीप तुपे, सूर्यकांत भुजबळ, श्रीकांत लावंड, बंडा गोडसे, भाजपाचे सतीश शेटे, विश्वास काळे, विठ्ठल वीरकर, अनिल पवार, शिवसेनेचे निलेश खुस्पे, हणमंत जगदाळे, दीपक चव्हाण, संपर्क प्रमुख तानाजीराव देशमुख, बाळासाहेब काळे यांची उपस्थिती होती.
संजय भगत म्हणाले, की जिहे-कटापूर, उरमोडी प्रकल्प पूर्ण व्हावेत म्हणून चळवळ उभी करावी लागेल. पुसेगाव, विसापूर, भोसरे परिसरातील २१ गावांना नेर धरणातून पाणी मिळावे यासाठी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखली प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू आहे.
बंडा गोडसे म्हणाले, की सदाभाऊंना मिळालेली ५० टक्के मते राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कारभारावरील नाराजी होती. दुष्काळी जनतेला खेळवत ठेवण्यापलिकडे सत्ताधाऱ्यांनी काही केले नाही. विकासाचे मुद्दे नसल्याने सत्ताधाऱ्यांनी जागा वाटपाचे आणि स्वबळाचे खूळ उभे केले आहे. पण आता जनता शहाणी झाली आहे, हे माढय़ातील चुरशीच्या लढतीवरून दिसून आले. प्रास्ताविक तानाजी देशमुख यांनी केले.