बारामती हे शहर महाराष्ट्रात आणि देशभरात शरद पवारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून हे शहर ओळखलं गेलं आहे. गेली अनेक वर्ष या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. मात्र बारामतीला आता नवीन ओळख मिळालेली आहे. शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मैदानावर बुधवारपासून रणजी क्रिकेट सामन्याला सुरुवात झालेली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बीसीसीआयच्या समितीने बारामतीच्या मैदानाची पहाणी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाला प्रथमश्रेणी सामन्यांचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या सामन्याने बारामतीत रणजी क्रिकेट सामन्याला सुरुवात झालेली आहे. सामना सुरु व्हायच्या आधी शरद पवारांच्या हस्ते छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंनी पवारांसोबत फोटोसेशनही केलं.

शरद पवारांनी या महत्वाच्या कार्यक्रमाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशात सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे बारामतीचं मैदान महाराष्ट्रासाठी किती लाभदायी ठरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.