News Flash

डिसले गुरुजी पुन्हा चमकले… जागतिक स्तरावर मिळाले आणखी एक सन्मानाचे पद

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून समजले जाणारे ‘ग्लोबल टीचर प्राइझ’ त्यांनी पटकावलं

भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जागतिक बँकेने सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.

डिसले गुरुजींची जून 2021 ते जून 2024 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे.

आणखी वाचा- जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना डिसले गुरुजींचे धडे

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना प्रदान करण्यात आला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे.

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ‘ग्लोबल टीचर प्राइझ’ ओळखले जाते. दहा लाख अमेरिकन डॉलर असे त्याचे स्वरूप आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) शाळेत मागील अकरा वर्षांपासून रणजितसिंह डिसले गुरुजी हे शैक्षणिक तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगामुळे जगभर ओळखले जातात. त्यांनी तयार केलेली ‘क्यूआर कोड’ शैक्षणिक पाठय़पुस्तके सध्या अकरा देशांतील दहा कोटींपेक्षा जास्त मुले वापरत आहेत. ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून डिसले गुरुजी दीडशेपेक्षा जास्त देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 12:32 pm

Web Title: ranjit disale got appointed as world banks educational advisor vsk 98
Next Stories
1 निर्बंध उल्लंघन केल्यानंतर सहा आस्थापनांवर कारवाई
2 डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे होम-हवन
3 ठोक किराणा,भुसार मालाच्या विक्रीस सकाळी ७ ते ११ परवानगी
Just Now!
X