राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. डॉ. डवले यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण तापताना दिसत आहे. भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी कांबळे यांना अटक करण्याची मागणी केली असून, याचा थेट परिणाम आरोग्य यंत्रणेवर होईल असा इशारा खासदार तडस यांनी दिला आहे.

आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरून असभ्य भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणानंतर भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आमदार कांबळे यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. खासदार तडस म्हणाले, “आमदार कांबळे यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना धमकावलं आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने तक्रार न केल्यानं कांबळेंची हिंमत वाढली. अनेक अधिकारी विनंतीवर बदली करून घेत जिल्हा सोडून गेले. मात्र, डॉ. डवले यांनी हिंमत दाखवून पोलीस तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल न घेतल्यास आरोग्य यंत्रणा नाराज होऊ शकते. याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाल्यास कांबळे हेच जबाबदार असतील. त्यामुळे कांबळे यांना अटक करावी,” अशी मागणी तडस यांनी केली आहे. यावेळी जि. प. अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावर, आरोग्य समिती सभापती माटे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे उपस्थित होते.

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

आणखी वाचा- “तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ

नेमकं प्रकरण काय?

वर्धा जिल्ह्यातील नाचन गाव येथे ९ मे रोजी आरटीपीसीआर चाचणी आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्रं काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अॅप ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी डॉ. डवले यांना फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. “तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावलं आहे,” असा आरोप डॉ. डवले यांनी केला होता.

डॉ. डवले यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आमदार रणजित कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेनंही केली होती. संबंधित आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा व नियमानुसार कारवाई करावी, नसता राज्यातील आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा विनंती वजा इशारा संघटनेनं दिला होता. त्यानंतर कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.