X
Advertisement

भाजपा खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निगरानी पथकाने दिली होती तक्रार

वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याची मागणी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी केली होती. अटकेच्या मागणीसाठी तडस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं पालन करण्यात न आल्याचं निदर्शनास आलं असून, याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निगरानी पथकाने दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात खासदार रामदास तडस आणि आयोजक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अधिकारी धनाजी जळक यांनी ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेत खासदार तडस काय म्हणाले होते?

“आमदार कांबळे यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना धमकावलं आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने तक्रार न केल्यानं कांबळेंची हिंमत वाढली. अनेक अधिकारी विनंतीवर बदली करून घेत जिल्हा सोडून गेले. मात्र, डॉ. डवले यांनी हिंमत दाखवून पोलीस तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल न घेतल्यास आरोग्य यंत्रणा नाराज होऊ शकते. याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाल्यास कांबळे हेच जबाबदार असतील. त्यामुळे कांबळे यांना अटक करावी,” अशी मागणी तडस यांनी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

वर्धा जिल्ह्यातील नाचन गाव येथे ९ मे रोजी आरटीपीसीआर चाचणी आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्रं काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अॅप ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी डॉ. डवले यांना फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. “तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावलं आहे,” असा आरोप डॉ. डवले यांनी केला होता.

डॉ. डवले यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आमदार रणजित कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेनंही केली होती. संबंधित आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा व नियमानुसार कारवाई करावी, नसता राज्यातील आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा विनंती वजा इशारा संघटनेनं दिला होता. त्यानंतर कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

24
READ IN APP
X