ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या वतीने ‘एक दिवस रंकाळ्यासाठी’ अशा नावाने १८ मार्च रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर दुसरी मोहीम ३ मे रोजी राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर सुनीता राऊत यांनी दिली.     
१८ मार्च रोजी रंकाळा चौपाटी, पद्माराजे उद्यान, पदपथ उद्यान, शालिनी पॅलेस या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या उपक्रमामध्ये सामाजिक संस्था, नागरिक, विविध तालीम संस्था, पर्यावरणप्रेमी यांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. रंकाळा स्वच्छतेची मोहीम दर ४५ दिवसांनी राबवावी असे महापौरांनी सुचविले होते.     
महापौर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये रंकाळा स्वच्छतेमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण यांनी बैठकीचा व मोहिमेचा हेतू विशद केला. गटनेते राजेश लाटकर यांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागावर स्वतंत्र अशी जबाबदारी नेमून देणे आवश्यक असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी महापालिकेच्या वतीने रंकाळा तलावाची नियमित स्वच्छता करणे तसेच बांधकाम विभागाकडून किरकोळ दुरुस्ती, रंगकाम व विद्युत दुरुस्ती वेळच्या वेळी करण्याची जबाबदारी संबधित अधिकाऱ्यांवर देण्यात येत असल्याचे सांगितले. यानुसार आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, उद्यान विभाग, अग्निशमन विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमविभागाकडील कर्मचारी वापरण्यात येणार असून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.