रमेश पाटील

वनव्यांचे प्रमाण वाढले; उपाययोजनांकडे दुर्लक्ष

वसंत ऋतूला सुरुवात झाली की, जंगलातील रानमेव्याची सर्वानाच चाहुल लागते, मात्र या वर्षी वसंत ऋतू संपला तरी अनेकांना करवंदे, तोरणे, धामणे, आळवा, जांभूळ अशी अनेक फळे (रानमेवा ) अजूनपर्यंत चाखायला मिळालीच नाहीत. वणव्यांच्या वाढत्या प्रमाणात रानमेवा संपुष्टात होण्याच्या मार्गावर असून याबाबत उपाययोजनेकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

वसंत ऋतूतल्या कडक उन्हाळ्यात कोरडय़ा पडलेला घशाला ओलावा म्हणून शहरातील लोक वेगवेगळ्या फळांचा रस घेत असतात, मात्र रानावनात कामधंद्यासाठी भटकणाऱ्या खेडुताला दोन-चार तोरणाची फळे अथवा करवंदे, जांभळे, आळवे खाण्यासाठी घेतली तर तहान भागली जाते. हा रानमेवा खाल्ल्याने एक प्रकारची शरीरात तरतरी येऊन पुन्हा काम करण्यास हुरूप उत्साह येत असतो. वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतूचे आगमण झाले असतानाही या वर्षी वाडा, विक्रमगड, कुडुस यांसारख्या लहान-मोठय़ा बाजारपेठत तोरणे, धामणे, आळवा, आवळे, चिंचा, जांभळे हा रानमेव दिसून आलाच नाही. हा रानमेवा व वनसंपदा नष्ट होण्याचे कारण दर वर्षी लागणारे वणवे हेच असल्याचे या जंगलात राहणाऱ्या आदिवासींकडून बोलले जात आहे.

एकंदरीत नेहमीच लागणाऱ्या वणव्यांकडे वन विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. हे वणवे वेळीच रोखले नाहीत तर भविष्यात येथील रानमेवा इतिहासजमा होईल अशी भीतीही स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.या वणव्यांमुळे जंगलातील दुर्मीळ औषधी वनस्पतींसह पशू-पक्षी यांची घरटी व घरटय़ांमधील त्यांची अंडी,  पिल्ले जळून जात आहेत. त्यामुळे जंगली पशू-पक्ष्यांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नविभागाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती करीत असताना हे वणवे का लागतात, ते रोखण्यासाठी त्यावर अधिक उपाययोजना काय केल्या पाहिजेत याबाबत काय ठोस कारवाई होताना दिसत नाही. वाडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर अभयारण्य असून या अभयारण्यातही नेहमीच लागणाऱ्या वणव्यांमुळे येथील पशुधन नष्ट झाले आहे.

वनऔषधे फळझाडांवरही परिणाम

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम जंगलातून मिळणाऱ्या रानमेव्यांच्या झाडांवर झाला आहे. या वणव्यात करवंदे, धामणे, तोरणे व आळवे ही रानमेवा देणारी लहान झाडे वणव्याच्या आगीत जळून खाक होऊ  लागली आहेत. वणव्यांमुळे  जांभूळ, चिंच, आवळा, आंबा या मोठय़ा झाडांवरसुद्धा परिणाम होऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या फळांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. तसेच अनेक वनौषधी झाडे या वणव्यांमुळे नष्ट होत आहेत.

वणवे रोखण्यासाठी व ते विझविण्यासाठी राखीव जंगल परिसराशेजारी ग्रामस्थांचे विशेष पथके नेमून वनखात्याने या वणव्यांवर नियंत्रण मिळवावे.

– राजेंद्र रिकामे, ग्रामस्थ, वैतरणा

जंगलातील बहुतांशी भाग हा वनपट्टेधारकांनी व्यापला आहे, फुले, फळे देणारी व वनौषधी झाडे जगविण्याची जबाबदारी व मालकी हक्क वनपट्टेधारकांवर वनखात्याने दिला तर निश्चितच या झाडांमध्ये वाढ झालेली दिसून येईल.

–  विजय जाधव,

सरचिटणीस, श्रमजीवी संघटना.