News Flash

तेंदू कंत्राटदारांकडून जप्त केलेली ‘ती’ रक्कम खंडणी की मजुरी?

आतापर्यंत या तिघांकडून १ कोटी ७६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी जप्त केलेली रोकड.

आलापल्ली येथे पोलिसांनी तेंदू कंत्राटदारांकडून जप्त केलेली एक कोटी, ७६ लाखांची रोकड नक्षलवाद्यांना खंडणी स्वरूपात देण्यात येत होती की तेंदू मजुरांची मजुरी वाटप करण्यासाठी आणण्यात आली होती, यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक ए. राजा यांनी ही रक्कम नक्षलवाद्यांना देण्यासाठीच आणल्या गेली, असा दावा केला आहे, तर तेंदू कंत्राटदारांच्या वर्तुळात ही रक्कम मजुरांना द्यावयाच्या मजुरीची होती, अशी चर्चा आहे.

नक्षल्यांना ७५ लाख रुपये नेऊन देण्याच्या तयारीत असताना २२ मे रोजी मध्यरात्री पोलिसांनी आल्लापल्ली येथून अटक केलेल्या तीन तेंदू कंत्राटदारांकडून पोलिसांनी आणखी एक कोटी एक लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मेच्या मध्यरात्री अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील विशेष अभियान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी आलापल्ली येथून पहाडिया तुळशीराम तांपला (३५), रवी मलय्या तनकम (४५), नागराज समय्या पुट्टा (३७) या तीन तेंदू कंत्राटदारांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील चारचाकी वाहनातून नक्षल पत्रके व ७५ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. न्यायालयाने तिघांची २८ मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केल्यानंतर अधिक चौकशीदरम्यान तिघांकडून आणखी १ कोटी १ लाख रूपये जप्त करण्यात आले. ही रक्क्म बोटलाचेरू येथे लपवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक ए. राजा यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

आतापर्यंत या तिघांकडून १ कोटी ७६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे प्रकरणाचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे सदर एक कोटी ७६ लाखांची रक्कम ही तेलंगणा राज्यातील वरंगल येथील तेंदूपत्ता कंत्राटदार खलील उल रहमान यांची आहे. हीद रक्कम रहमान यांचा व्यवस्थापक नागराज पुट्टू हा घेऊन आलेला होता. त्यामुळे त्याला अटक झालेली आहे. रहमान यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही रक्कम ही तेंदूपत्ता मजुरांना मजुरी देण्यासाठी आणण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी नक्षलवाद्यांना ही रक्कम पोहचविली जात होती असे नाटय़ रचले असल्याचीही चर्चा तेंदुपत्ता कंत्राटदारांच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झालेली आहे. तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या मजुरांना रोखीने मजुरी द्यावी लागते. त्यामुळे तेंदू कंत्राटदार हे रोख रक्कम जवळ ठेवतात. त्यामुळे मजुराांनाच ही रक्कम वितरीत केली जाणार होती, अशी चर्चा आहे. मात्र पोलिसांनी नक्षलवाद्यांनाच ही रक्कम दिल्या जाणार होती असा दावा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे ही रक्कम नेमकी कुठे जात होती यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे तेंदू हंगामात नक्षलवाद्यांना खंडणी द्यावी लागते ही वस्तुस्थिती आहे. परंतु नक्षलवादीच नाही तर गडचिरोलीत तेंदू हंगामामध्ये अनेकांना असे स्वरूपाचे अर्थरूपी बक्षीस दिले जाते, असेही एका कंत्राटदाराने लोकसत्ताशी बोलताना सांगितले. हा व्यवहार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. परंतु याची चर्चा होत नाही. मात्र, यावेळी पोलिसांनी रोकड पकडल्याने ही चर्चा चांगलीच रंगलेली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 1:37 am

Web Title: ransom wages maharashtra police naxalism
Next Stories
1 किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येणार
2 ‘जय महाराष्ट्र’वर बंदी घालणाऱ्या कर्नाटकला कोयना, वारणेतून पाणी
3 २५ शेतकऱ्यांच्या अस्थींचे कृष्णा नदीत विसर्जन
Just Now!
X